भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील : अशोक जैन
फालीच्या इन्व्होशन सादरीकरणात मुंबई तर बिझनेस प्लॅनमध्ये बारामतीची शाळा प्रथम
जळगाव (5 जून 2026) : शेतकर्यांच्या चेहर्यावरील हसू हा माझा खरा पुरस्कार आहे, असे माझे वडील श्रद्धेय मोठेभाऊ नेहमी सांगत होते. त्यांचा विचारांचा वारसा पुढे नेत, आज विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील समाधान आणि तेज पाहून भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीच्या याच विद्यार्थ्यांमधून घडतील, असा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फाली (ऋ-ङख) उपक्रमातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शुक्रवारी केले. त्यांच्या हस्ते फालीच्या दुसर्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन्स पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
जैन तंत्रज्ञानामुळे देशाच्या निर्यातील केळी फळ प्रथम
जैन इरिगेशनच्या पाईप, ठिबक सिंचन आणि टिश्यू कल्चर या तंत्रज्ञानामुळे जळगावसह देशातील केळी लागवडीत मोठी क्रांती घडल्याचे अशोक जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, जळगावातून सुरू झालेली केळीची लागवड आज संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक ते मणिपूरपर्यंत पोहोचली आहे. टिश्यू कल्चरद्वारे विकसित केलेल्या ‘ग्रँड नाईन’ जातीच्या केळीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे.





मागील वर्षी भारतातून सुमारे 4400 कोटी रुपयांच्या केळीची निर्यात झाली आहे. तर भारत देशाच्या फळांच्या निर्यातीमध्ये ऐतिहासिक विक्रम करून केळी फळाने यावर्षी प्रथम स्थान मिळविले आहे. जागतिक बाजारपेठेत भारताने पाच टक्के वाटा मिळविला असून 2047 या अमृत काळात देशाची केळी निर्यात पाच पटीने वाढेल. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे ठिबक सिंचन, गुणवत्तापूर्ण रोपे देणारे टिश्यू कल्चर आणि शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे निर्यातक्षम तंत्रज्ञान यामुळे केळी उत्पादक शेतकर्यांची आर्थिक प्रगती होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वातावरण बदलामुळे वारावादळ व गारपिटीने दरवर्षी केळीचे मोठे नुकसान होते यावर मात करण्यासाठी केळी उत्पादनाचे (नवीन मॉडेल) तंत्रज्ञान विकसीत करणे हे आता काळाची गरज झाली आहे. आगामी काळात केळीच्या आणखी दोन नव्या जाती बाजारात आणण्याचे काम सुरू असून देशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टिश्यू कल्चर रोप उत्पादन क्षमताही वाढविण्यात येत असल्याचे अशोक जैन यांनी सांगितले.
फालीच्या कृषी इन्व्होशन सादरीकरणात 53 तर कृषी बिझनेस प्लॅनमध्ये 53 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात पहिल्या आलेल्या पाच शाळांना पारितोषिक देण्यात आली. त्याचा निकाल
कृषी इन्व्होशन सादरीकरण – प्रथम- उदयचल हायस्कूल (विक्रोळी, मुंबई), द्वितीय- शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती), तिसरा-मार्तंडराव पाटील कपगटे हायस्कूल (जंभाली , भंडारा), चौथा- रावजी फटे विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, (खराशी, भंडारा), पाचवा- न्यू इंग्लिश स्कूल (मोहपा, नागपूर) या शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कृषी बिझनेस प्लॅन – प्रथम-शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती), द्वितीय-पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय (अकुलखेडा, ता. चोपडा, जि. जळगाव), तिसरा क्रमांक- एस.एस.पाटील विद्यामंदिर (चहार्डी, चोपडा, जि.जळगाव), चौथा- कुलस्वामी खंडेराय विद्यालय, (हिवरे, जुन्नर, पुणे), पाचवा- उदयचल हायस्कूल (विक्रोळी, मुंबई) या शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
फालीचे विद्यार्थी कार्तिक कुमार (मुंबई), तनिष्का बडगुजर (बड़वानी, मध्य प्रदेश), शर्वरी चव्हाण (बारामती), सुज्ञा हडवळे (जुन्नर, पुणे) यांनी या उपक्रमातून काय शिकण्यास मिळाले, त्याबद्दल आपले अनुभव सांगितले. तसेच फालीचे माजी विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यात कृतिका लकडे, अजिंक्य डोंगरे (गावडेवाडी जि. पुणे) यांचा समावेश आहे. डॉ. आर. एस. मसली (गोदरेज अॅग्रोवेट), मुनेश सक्सेना (आयटीसी), उपमा गोयल (स्टार मॅग्री), मिलकेश राठोड (प्रॉम्ट), सायली नागरे (अमूल) या कंपनी प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले. फालीच्या उपाध्याक्षा नॅन्सी बेरी यांनी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. सीईओ शर्बोनी पोदार यांनी येत्या काही वर्षांत फालीचा विस्तार देशातील सर्व राज्यांमध्ये करण्याचा संकल्प व्यक्त केला. फालीच्या या उपक्रमास जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोवेट, युपीएल, स्टार अॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल आणि उज्जीवन या कंपन्यांचे सहकार्य लाभते.
तिसरा टप्पा 7 जूनपासून
फालीचा समारोपाचा तिसरा टप्पा 7 व 8 जून रोजी होणार आहे. त्यात 7 जून रोजी विद्यार्थी फिल्ड व्हिजीट करतील तसेच जैन इरिगेशनच्या शेती संशोधन व विकास केंद्रात शेती विषयक विविध प्रकल्पाची भेट देऊन प्रगतशील शेतकरी व जैन इरिगेशनच्या तज्ज्ञांशी संवाद साधतील. 8 जून रोजी बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन्सचे सादरीकरण होईल. त्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविले जाईल व 12 व्या फाली संमेलनाचा समारोप होईल.