पापाचा घडा भरलाच : अंबडचा महालाचखोर तहसीलदार सहा लाख 40 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Ambad’s corrupt Tehsildar caught in ACB trap while accepting a bribe of ₹6.40 lakh. अंबड (7 जून 2026) : प्रामाणिकपणाचा दिखावा करणार्या अंबडच्या तहसीलदाराला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना अटक केल्याने महसूल वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. विशेष म्हणजे स्वतःला सिंघम समजणारा व कारवायांच्या माध्यमातून चर्चेत राहणारा अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण अखेर वाळूच्या नादात फसला.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या अवैध वाळू उपसा करणार्या पोकलेन मशीनवर जप्तीची कारवाई न करण्यासाठी आणि सहा हायवा गाड्या विनातक्रार सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण याने तब्बल सात लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. शासकीय पदाचा रुबाब दाखवून दरमहा खंडणी उकळण्याचा हा धक्कादायक प्रकार होता. त्रासलेल्या तक्रारदाराने थेट बीड एसीबीकडे धाव घेतली.
आधी पडताळणी नंतर रचला सापळा
उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आधी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर झालेल्या तडजोडीत 6 लाख 40 हजार रुपयांचा आकडा ठरला. शनिवारी सायंकाळी पैसे घेण्याचे निश्चित होताच एसीबीच्या पथकाने अचूक सापळा रचला.
शनिवारी सायंकाळी ठरल्याप्रमाणे रक्कम सुपूर्द केली जात असतानाच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घातली आणि तहसीलदार विजय चव्हाण याच्या मनगटात कायद्याच्या बेड्या ठोकल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा सापळरा यशस्वी झाला. कारवाईत अंमलदार बीडकर, खारसडे, पुरी, सुरवसे, पुरी आदींचा सहगाग होता.


