अल निनोमुळे राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता : मुख्यमंत्री

फडणवीस म्हणाले, राज्यात ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज’ मोहीम


मुंबई (7 जून 2026) : यंदाचे वर्ष ‘अलनिनो’चे असल्याने सरासरी पाऊस 92 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सरासरी 92 टक्के पाऊस असला, तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि राज्यातील आवर्षण प्रवण (दुष्काळी) भागांमध्ये या सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये, यासाठी त्यांनी योग्य वेळीच पेरणी करावी, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. कमीत कमी पावसात शेतकर्‍यांचे जास्तीत जास्त नुकसान कसे टाळता येईल, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

’ई-85’ इंधनाचा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मोठा फायदा
देशात नव्याने येत असलेल्या ’ई-85’ (ए-85) या पर्यावरणपूरक इंधनाबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी आशा व्यक्त केली. या नव्या इंधनाचा देशात सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार आहे, कारण आपला राज्य इथेनॉलच्या निर्मितीत देशात अग्रेसर आहे, असे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारकडून‘फ्युयल ब्लेंडिंग’ला (इंधन संमिश्रण) मिळणारे प्राधान्य आणि 100 टक्के इथेनॉलवर चालणार्‍या गाड्यांचे धोरण यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील ऊस उत्पादक आणि इतर शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंधन दरवाढीवरून शरद पवारांना प्रत्युत्तर
वाढत्या इंधन आणि गॅस दरांचे राजकीय हादरे सत्ताधार्‍यांना बसतील, या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. जगभरातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा हवाला देत फडणवीस म्हणाले की, सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील एकही देश असा राहिलेला नाही, जिथे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत. ही जागतिक समस्या असून सगळीकडेच दर वाढले आहेत. असे असले तरी केंद्र सरकार या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, सर्वसामान्यांची चिंता सरकारला आहे. योग्य वेळी यावर योग्य निर्णय घेतले जातील.

‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज’
राज्यात आणि देशात सध्या अंमली पदार्थांविरोधात ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज’ ही मोहीम तीव्र गतीने राबवली जात आहे. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चोख माहिती गोळा करून मोठ्या कारवाया केल्या जात असून, कुठल्याही परिस्थितीत ड्रग्जच्या काळ्या जाळ्याची पाळेमुळे खणून काढली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलाना दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !