बुलढाणा जिल्ह्यातील बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी कारवाई : एलसीबी निरीक्षकासह पोलीस अधिकारी तडकाफडकी निलंबित


बुलढाणा (8 जून 2026) : बनावट हत्याकांड प्रकरणी तपासात हलगर्जीपणा करणार्‍या एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना अमरावती पोलीस आयुक्तांनी निलंबित केल्यानंतर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मृताची ओळख पटली नसताना दोघांना केली होती अटक
जळगाव जामोद हत्याकांड प्रकरणातील मृत मुलीची अद्याप ओळख पटलेली नसताना जिवंत शिवानीला मृत जाहीर करून तिच्या वडील आणि भावाला न केलेल्या खुनाबद्दल अटक करण्यात आली होती. तसेच गुन्ह्याची कबुली देण्यासाठी त्यांच्यावर दबाव देखील टाकण्यात आल्याचा आरोप जळगाव जामोदच्या पोलिसांवर होता. या प्रकरणावरून पोलिसांवर टीकेची झोड उठली होती तर पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

काय आहे नेमके प्रकरण ?
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजुरा धरण परिसरात एका अनोळखी मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याआधीच आणि डीएनए अहवाल येण्यापूर्वीच हा मृतदेह ‘शिवानी’ नावाच्या मुलीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवानी जिवंत असतानाही तिला मृत जाहीर करून, खुनाच्या गुन्ह्यात शिवानीच्या निष्पाप वडील आणि भावाला जळगाव जामोद पोलिसांनी अटक केली तसेच मुलीच्या न केलेल्या हत्येच्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी वडील आणि भावावर पोलिसांनी दबावही टाकला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

राजुरा जंगलात झालेल्या खून प्रकरणात न केलेल्या खुनात आरोपी केलेल्या बाप लेकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी उलटे टांगून मारहाण करून हा खुनाचा आरोप कबूल करायला लावल्याचे बाप लेक सांगत आहेत त्यामुळे या खून प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला व तपासातील हलगर्जीपणामुळे दोन जबाबदार अधिकार्‍यांना निलंबित करण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घेतला.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आज जळगाव जामोदला भेट देणार आहेत. यावेळी बुलढाणा पोलिसांची ते बैठक घेतील. प्रकरणाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना करतील, अशी शक्यता आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !