मनमाड लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई : पंजाबमेलमधील 91 लाखांची चोरी उघड : तक्रारदारच निघाला आरोपी
दोन आरोपींना अटक : चोरीतील 80.84 लाखांचा मुद्देमाल जप्त : कारवाईचे स्वागत
गणेश वाघ
Bold action by Manmad Railway Police: Rs 91 lakh theft on Punjab Mail solved; complainant turns out to be the accused. भुसावळ (8 जून 2026) : अप 12138 पंजाब मेलने मुंबईला निघालेल्या ज्वेलर्स कंपनीतील कर्मचारी असलेल्या प्रवाशाची 91 लाखांचा ऐवज असलेली पर्स मनमाड रेल्वे स्थानक आल्यानंतर लांबवण्यात आली होती. चोरीची ही घटना 4 जून रोजी घडली होती. मनमाड लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीचा दिवस करीत चोरट्यांचा माग काढला. तांत्रिक विश्लेषण, खबर्यांचे नेटवर्क व सीसीटीव्हीचा आधार घेत रेल्वे पोलिसांनी या चोरीची उकल केली आहे. तक्रारदारच या प्रकरणातील संशयीत निघाला असून त्याने दोन साथीदारांच्या माध्यमातून ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी तक्रारदारासह दोन संशयीतांना अटक करण्यात आली एक साथीदार पसार आहे. पोलिसांनी चोरीतील एकूण 80 लाख 84 हजार 295 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमके प्रकरण काय ?
मनमाड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवासी नरेश नेमाराम जाट (27) हे न्यु चौधरी ट्रेडर्स-ज्वेलर्समध्ये कर्मचारी आहेत व ते 4 जून 2026 रोजी पंजाब मेलने विदीशा ते मुंबईकडे प्रवास करीत असताना मनमाड रेल्वे स्थानक आल्यानंतर ते वॉशरूमला गेल्यानंतर बी-2 डब्यातील त्यांच्या बर्थ क्रमांक 40 वर ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याबाबत त्यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या बॅगेत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू तसेच 56 लाखांची रोकड, सुमारे 10 लाख 32 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच विविध प्रकारचे चांदीचे दागिने आणि भांडी यांचा समावेश होता. एकूण मुद्देमालाची किंमत 91 लाख 34 हजार 295 रुपये इतकी असल्याचे तक्रारदाराने नमूद केले होते.
पोलिसांचा संशय ठरला खरा : फिर्यादीच निघाला आरोपी
या गुन्ह्याचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर त्यांचा संशय तक्रारदारावरच बळावला. तपासादरम्यान आरोपी लक्ष्मण लोढा राम (रा. राजस्थान) याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या पुण्यातून मुसक्या बांधण्यात आल्या व त्याने चौकशीत त्याने साथीदार राजू परिहार याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरीत मूळ तक्रारदार नरेश जाटचाही सहभाग असल्याची कबुली दिली व चोरीचा मुद्देमाल राजू परिहारच्या स्विफ्ट कारमध्ये ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चोरीतील 80 लाख 84 हजार 295 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या गुन्ह्यातील राजू परिहार हा पसार असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी आणला गुन्हा उघडकीस
ही चोरी उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये, रेल्वे सुरक्षा बलाचे मनमाड सहायक आयुक्त राजेश कुमार केशरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, संभाजी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक दीपक दुहन, उपनिरीक्षक चंदन साकला, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राणे, हवालदार प्रकाश पावसे, हवालदार अनंता आघाव, हवालदार प्रकाश केदार, हवालदार गायकवाड, हवालदार प्रमोद जाधव, हवालदार मनोज खंडागळे, शिपाई नितीन देशमुख, कांदे, वाघ, अविनाश डावरे, तसेच सायबर सेल लोहमार्ग छत्रपती संभाजी नगरचे शिपाई वैभव पाटील, मनोज वाघ, रेल्वे सुरक्षा बल मनमाडचे एएसआय गणेश थोरे, आरक्षक मनोज नाईक, धर्मेंद्र यादव, महेंद्र चौखट आदींच्या पथकाने केली.



