1600 अंश तापमानाचा लोहरस मजुरांच्या अंगावर पडल्याने आठ मजुरांचा मृत्यू


विशाखापट्टणम (8 जून 2026) : 1600 अंश तापमानाचे वितळलेले लोह (मोल्टन आयर्न) मजुरांच्या अंगावर पडून झालेल्या अपघातात आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील स्टील प्लान्टमध्ये सोमवारी झाला. प्लान्टमध्ये अनेक जण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लान्टमध्ये क्रेनच्या मदतीने एका मोठ्या बकेटमध्ये वितळलेले लोह एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेले जात होते. याच दरम्यान बकेटचा तोल बिघडला आणि त्यातील गरम लोह खाली काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर पडले.

हा अपघात राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडच्या स्टील प्लान्टमध्ये झाला. अपघातानंतर प्लान्ट परिसरात गोंधळ उडाला. मदत आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात पोहोचवले.

बधिकार्‍यांनी सांगितले की, सध्या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे. तांत्रिक बिघाड किंवा सुरक्षा मानकांमध्ये कोणतीही त्रृटी होती का, याचा शोध घेतला जात आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तर, गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्तांशी फोनवर बोलून घटनेची माहिती घेतली. त्यांनी अधिकार्‍यांना जखमींना उत्तम उपचार देण्याचे आणि बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले.

देशातील पहिला किनारी स्टील प्लान्ट
विशाखापट्टणम स्टील प्लान्ट केंद्र सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. या प्लान्टमध्ये उत्पादन 1992 मध्ये सुरू झाले होते. हा देशातील पहिला आणि एकमेव किनारी स्टील प्लान्ट आहे, जिथून कच्च्या मालाची आयात आणि तयार पोलादाची निर्यात केली जाते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !