जळगावातील कुलर निर्मित्या कंपनीला भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान


Massive fire at a cooler manufacturing company in Jalgaon; loss worth lakhs of rupees जळगाव (9 जून 2026) : शहरातील जळगाव औद्योगिक वसाहतीतील एका कुलर निर्मिती करणार्‍या कंपनीला सोमवार, 8 जून रोजी दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील कच्चा माल आणि तयार कुलर जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे शेजारीच असलेली लाकडाची मोठी वखार आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून बचावली.

शॉर्ट सर्किटने आगीचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसीतील एल सेक्टरमध्ये असलेल्या कुलर निर्मिती कंपनीत सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीत काम सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाले आणि ठिणगी उडून आग लागली. कुलर निर्मितीसाठी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर लागणारे सुके गवत (पॅड), प्लास्टिकचे साहित्य आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ आणि धूर दूरवरून नजरेस पडत होते.

अग्निशमन दलाची धाव
आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग लागलेल्या कंपनीच्या अगदी लागूनच लाकडाची एक मोठी वखार (डेपो) आहे. जर आगीच्या ज्वाला तिथे पोहोचल्या असत्या, तर आगीने आणखी भीषण रूप धारण केले असते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेचे गांभीर्य ओळखून पाण्याचा मारा सुरू केला आणि सुमारे अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले.

या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. घटनेनंत कंपनीचे मालक लल्लन यादव यांनी आगीत कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत, आग नेमकी कशी पसरली याबद्दलची माहिती दिली. पोलीस आणि प्रशासनाकडून आता नुकसानीचा अचूक पंचनामा केला जात आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !