एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या अतिक्रमणावर महापालिकेने चालवला बुलडोझर


Municipal Corporation bulldozes encroachment by accused in MD drugs case जळगाव (9 जून 2026) : शहरात चर्चेत असलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणातील अटकेत असलेल्या एका संशयित आरोपीच्या घरावरील अतिक्रमणावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे

एमडी ड्रग्स प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित आरोपी अद्याप पसार आहेत. अटकेत असलेल्या संशयित आरोपी रईस देशमुख याच्या सुप्रीम कॉलनी परिसरातील घरासमोरील अतिक्रमित बांधकामावर महानगरपालिका आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. या मोहिमेत अतिक्रमणाखाली उभारण्यात आलेली दोन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.

कारवाईदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते.

महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्याबाबत एमआयडीसी पोलिसांकडून अतिक्रमण विभागाला पत्र प्राप्त झाले व त्यानंतर संबंधित बांधकामाची पडताळणी करून नियमानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींच्या मालमत्तांवरील अतिक्रमणाचीही तपासणी सुरू असून नियमबाह्य बांधकाम आढळल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी अशाच धडक कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !