17 हजारांची लाच भोवली : शहादा तालुक्यातील वनरक्षक नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
₹20,000 Bribe Costs Dearly : Shahada Taluka Forest Guard Caught in Nandurbar ACB Trap भुसावळ (9 जून 2026) : शेतीच्या बांधावरील बाभुळाची झाडे गुजरात राज्यात विक्रीसाठी नेल्यानंतर वाहनावर कुठलीही कारवाई न केल्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती 17 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शहादा तालुक्यातील कोंढावळ बीटच्या वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे यांना नंदुरबार एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली आहे. या कारवाईने वनविभागातील लाचखोर धास्तावले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदार ग्रामपंचायत हद्दीत शेताच्या बांधावरील, माळरानावरील काटेरी बाभूळ जातीच्या झाडे ग्रामपंचायतीच्या परवानगीने तोडून त्याची गुजरात राज्यात टाटा मॅजिक वाहनाने वाहतूक करतात. मार्च 2026 ते मे 2026 दरम्यान वेळोवेळी वाहनाने झाडांची वाहतूक केल्याने कारवाई न केल्याच्या मोबदल्यात 17 हजारांची लाच तेजस्विनी साळुंखे यांनी मागितल्याने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व मंगळवारी सायंकाळी सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, सहा.पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदार जितेंद्र महाले, हवालदार संदीप खंडारे, रेशमा परदेशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


