गांधींच्या सेवाग्राम आश्रमात नशाबंदी मंडळाच्या संघटकांची तीन दिवसीय राज्यस्तरीय बैठक
जळगाव जिल्हा संघटकपदी प्रा.डॉ.दयाघन राणे यांची नियुक्ती ; व्यसनमुक्त जळगाव घडविण्याचा संकल्प
वर्धा (11 जून 2026) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यातील 36 जिल्हा संघटकांची संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक 5 ते 7 जून दरम्यान गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत वर्ष 2026-27 साठीच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले तसेच जिल्हा संघटकांना मान्यता प्रमाणपत्रे व जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
बैठकीचे उद्घाटन नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते ‘कल्याणयात्रा’ व वार्षिक कार्यअहवाल प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाले. यावेळी सरचिटणीस वर्षा विद्याविलास, मुख्य संघटक व चिटणीस अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, कार्यकारी सदस्य बॉस्को डिसुझा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डॉ. नितिका व त्यांची टीम तसेच राज्यातील सर्व जिल्हा संघटक व विभागप्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजन वेळूकर यांनी स्वयंसेवी संस्थांसाठी निधी उभारणीचे महत्त्व, प्रभावी सादरीकरणाची आवश्यकता आणि समाजपरिवर्तनातील संघटकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्हा संघटकांच्या कार्याचे कौतुक करत त्यांची तुलना सूर्याशी केली.
बैठकीदरम्यान उत्कृष्ट कार्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघटक अर्पिता मुंबरकर यांना सुवर्णपदक, नागपूरचे गौरव आळणे यांना रौप्यपदक तर पालघरचे मिलिंद पाटील यांना कांस्यपदक प्रदान करण्यात आले. विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कार्याबद्दल पुणे विभाग प्रमुख अॅड. सुरेश संकटे यांच्या टीमला प्रथम क्रमांक, तर कोकण विभाग प्रमुख दिशा कळंबे यांच्या टीमला द्वितीय क्रमांकाचा सन्मान देण्यात आला.
दुसर्या दिवशी जिल्हानिहाय परिचय सत्र व वार्षिक कार्यक्रम नियोजन पार पडले. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन शाळा व तीन महाविद्यालये तंबाखूमुक्त करण्याचा तसेच ‘ड्रग्स फ्री जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवून ‘नशामुक्त भारत अभियान’ अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला. संघटकांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन सर्वधर्म प्रार्थनेत सहभाग नोंदविला तसेच व्यसनमुक्तीविषयक पथनाट्य सादर केले.
समारोपाच्या दिवशी कार्यकारी सदस्य बॉस्को डिसुझा यांनी नव्या अंमली पदार्थांची ओळख या विषयावर मार्गदर्शन केले, तर सुजाता सावंत यांनी जिल्हास्तरावर निधी उभारणीच्या विविध संधींबाबत माहिती दिली. जिल्हा परिषद वर्धाचे समाजकल्याण विभागाचे निरीक्षक राज मरापे यांनी उपस्थित राहून संघटकांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते सर्व सहभागी संघटकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, या बैठकीत जळगाव जिल्हा संघटक म्हणून प्रा. डॉ. दयाघन राणे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर बोलताना त्यांनी प्रशासन, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने व्यसनमुक्त जळगाव जिल्हा घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.


