भुसावळातील 16 वर्षीय विद्यार्थ्याचा तापी नदीपात्रात बुडून मृत्यू
पोहण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना : अकरावीत प्रवेशाचे स्वप्न राहिले अपूर्ण
16-year-old student from Bhusawal drowns in the Tapi River. भुसावळ (14 जून 2026) : भुसावळ शहरातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुण मित्रांसोबत तापी पात्रात पोहण्यासाठी गेल्यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. प्रतीक अनिल महाजन (16, गंगाराम प्लॉट) असे मयताचे नाव आहे. या घटनेने शहरातील गंगाराम प्लॉट भागात शोककळा पसरली.
मित्रासोबत गेल्यानंतर दुर्घटना
प्रतीक महाजन व त्याचा मित्र यश लोखंडे (21) हे दोघे कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता शनिवारी सकाळी 11 वाजता तापी नदीवर पोहण्यासाठी गेले असता शेळगाव बॅरेजच्या बॅक वॉटरमध्ये बुडालेल्या लहान पुलाजवळ ते पोहोचले. तेथे सर्वप्रथम प्रतीक पाण्यात उतरला. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. हे दृश्य पाहून पाण्यात उतरण्याच्या तयारीत असलेला यश घाबरला. त्याने आरडाओरड सुरू केली.

माजी नगरसेवक नितीन धांडे यांची धाव
हा प्रकार पाहून बाजूला असलेल्या एका व्यक्तीने मदतीसाठी धाव घेतली. यशने आपल्या भावाला दूरध्वनीवरून प्रतीक पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. यशच्या भावाने ही माहिती माजी नगरसेवक नितीन धांडे यांना देताच धांडे यांनी प्रतीकच्या काकांना सोबत घेऊन तापी नदी गाठली. परिसरातील पट्टीच्या पोहणार्यांना बोलावण्यात आले. 10 जणांच्या पथकाने शोधमोहीम राबवली. सुमारे अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर प्रतीक सापडला पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.
शहर पोलिसात नोंद
ही घटना कळताच शहर ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल भंडारे यांनी कर्मचार्यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. प्रतीक हा अनिल महाजन यांचा एकुलता एक मुलगा होय. ते एका दुकानात कामाला असून प्रतीकची आई मजुरी करते. त्याला एक लहान बहीण आहे. दरम्यान, नगरसेवक निर्मल कोठारी, किरण कोलते, दीपक धांडे यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून कुटुंबीयांचे सांत्वन केले. शनिवारी सायंकाळी सहा वाजता गंगाराम प्लॉट भागातील संतोषी माता मंदिराजवळील निवासस्थानातून प्रतीकची अंत्ययात्रा निघाली.
