धुळे तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : गोव्यात हातचलाखी करून पसार झालेल्या गुजरातच्या टोळीला बेड्या
Major achievement by Dhule Taluka Police: Gujarat gang arrested after fleeing Goa following a sleight-of-hand theft धुळे (14 जून 2026) : गोवा राज्यातील मोपा विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपींनी प्रवाशाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडील सोन्याची चैन व अंगठी हातचलाखीने लंपास केल्यानंतर आरोपी कारने धुळेमार्गे पसार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
काय घडले गोव्यात ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून 2026 रोजी मोपा विमानतळ परिसरात फोक्सवॅगन कंपनीच्या चारचाकी वाहनात बसलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीशी संवाद साधून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याची चैन शुद्ध करून देण्याचे आमिष दाखवत चैन व अंगठी घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी गोवा राज्यातील मोपा विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती व आरोपी जाळ्यात
13 जून रोजी हे आरोपी वापरत असलेले वाहन धुळे जिल्ह्यात येत असल्याची माहिती गोवा पोलिसांकडून धुळे तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने महिंदळे शिवारात सापळा रचून संशयित वाहन (जी.जे.01 आर.बी.0006) येताच वाहनातील तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी आपली नावे जाननाथ पारसनाथ मदारी (सासर, 45), नारुनाथ उर्फ नटवरनाथ पारसनाथ मदारी (40, दोन्ही रा.गणेशपुरा मदारी नगर, ता.देहगाम, जि.गांधीनगर, गुजरात), दीपकनाथ सुरमनाथ मदारी (26, गोपालनाथ वालू फलिया तैय्यबपुरा कपडवंज, जि.नडीयाद, खेडा, गुजरात) सांगितले.
एक लाख 90 हजारांचा ऐवज जप्त
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात फोक्सवॅगन कंपनीची चारचाकी, सोन्याची चैन, सोन्याची अंगठी आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. धुळे तालुका पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांना धुळे न्यायालयासमोर हजर करून ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका निरीक्षक धनंजय पाटील, अंमलदार रवींद्र राजपूत, कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे, भावेश झिरे आदींच्या पथकाने केली.




