सावद्यात भरधाव कारने दुचाकीसह पादचार्‍यांना उडवले : एक जण जागीच ठार, पाच गंभीर जखमी


सावदा (15 जून 2026) : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचार्‍यांना तसेच दुचाकीला धडक दिल्याची घटना सावदा शहरातील सोनाली कोल्ड्रिंक्सजवळ रविवार, 14 जून सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेतील एकाचा मृत्यू झाला असून पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले सावदा शहरात
वडगाव (ता.रावेर) येथील सरफराज समशेर तडवी हा त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-20 कार (क्रमांक एम.एच.01 ए.आर.2706) ही वाघोदा बु.॥ कडून सावद्याच्या दिशेने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे कार चालवत असताना त्याने सावदा-वाघोदा मार्गावरून जाणार्‍या विनानंबर स्प्लेंडर प्लस दुचाकीवरील शेख जकरीया शेख जहीर, शेख रिजवान, शेख रियाज व मुदस्सर शेख जमीर (रा. चिनावल, ता. रावेर) यांना जोरदार धडक दिली.



धडक झाल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोरगाव बु.॥ येथील आत्माराम बाबुराव ढिवरे, त्यांची पत्नी मंदाबाई ढिवरे आणि मुलगा मनोहर ढिवरे यांच्यावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात आत्माराम बाबुराव ढिवरे (53) यांचा जागीच मृत्यू झाला तर मनोहर ढिवरे, मंदाबाई ढिवरे यांच्यासह दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मनोहर आत्माराम ढिवरे (25, रा.मोरगाव बु.॥, ता.रावेर) यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसात आरोपी चालक सरफराज समशेर तडवी (वडगाव, ता.रावेर) विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !