लालपरीचा प्रवास जुलैपर्यंत महागच ! भाडेवाढीची प्रवाशांच्या खिशाला झळ
‘Lalpari’ travel to remain expensive until July! Fare hike hits passengers’ pockets मुंबई (16 जून 2026) : वाढत्या इंधन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बस सेवांसाठी लागू केलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ जुलै 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सुधारित वाढीव भाडेदर 15 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील.
उन्हाळ्यात झाली होती भाडेवाढ
उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन प्रवासी वाहतुकीचे नियोजन आणि महसूल वाढवण्यासाठी 15 एप्रिल 2026 पासून ही 10 टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या भाडेवाढीची मुदत 15 जून रोजी संपणार होती मात्र डिझेलच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि त्यामुळे महामंडळावर पडणारा प्रचंड आर्थिक भार आणि एसटी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ आणि त्याचा तिजोरीवर होणारा परिणाम. या दोन मुख्य कारणांमुळे महामंडळाला हा नाइलाजास्तव निर्णय घ्यावा लागला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळालेला नसला तरी पूर्वीचेच वाढीव दर पुढील महिनाभर कायम राहतील. महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकार्यांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज रात्री 12 नंतरही प्रवाशांना साध्या बससाठी वाढीव दरानेच तिकीट काढावे लागणार आहे.




