पाचोर्‍यानजीक एसबीआयचे एटीएम लुटण्याचा डाव फसला : पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांनी ठोकली धूम

आठ लाख 89 हजारांची रोकड वाचली : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


Attempt to rob SBI ATM near Pachoryan foiled: Police alertness foils thieves’ bid पाचोरा (17 जून 2026) : सुरक्षा रक्षक नसल्याची संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री पाचोरा शहराजवळील एसबीआयचे एटीएम लुटण्याचा डाव आखला व गॅस कटरने एटीएमचा कॅश ट्रे बाहेर काढला मात्र पोलिसांना माहिती कळताच त्यांनी धाव घेतल्यानंतर चोरट्यांनी धूम स्टाईल पळ काढला. आरोपींच्या शोधासाठी संपूर्ण जिल्ह्यासह नजीकच्या धुळे व मध्यप्रदेशातही अलर्ट जारी करण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे एटीएममधील आठ लाख 89 हजार 700 रुपयांची रोकड पूर्णपणे सुरक्षित राहिली.

काय घडले पाचोरा शहरात ?
बुधवार, 17 जून रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास पाचोरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जारगाव येथील सारोळा रस्त्यावरील एसबीआयच्या एटीएममधील रोकड लुटण्याचा तीन दरोडेखोरांनी प्रयत्न केला. एटीएममध्ये काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पाचोरा पोलिसांना सतर्क नागरिकांनी दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली तर याचदरम्यान आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचे कॅबिनेट तोडले व कॅश ट्रे मधून ते कॅश बाहेर काढताच तोच पोलिसांचे वाहन येत असल्याची चाहूल लागताच संशयीत एटीएम सोडून काळ्या रंगाच्या क्रेटा गाडीत (एम.एच. 49 सी.एस.7028) बसून पसार झाले.

पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग
पाचोरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहताच चोरट्यांची तारांबळ उडाली. चोरटे पैशांचे कॅबिनेट तिथेच टाकून क्रेटा गाडीत बसून तारखेड्याच्या दिशेने सुसाट वेगाने पसार झाले व पाचोरा पोलिसांनी तत्काळ या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा थरारक पाठलाग धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत सुरू होता.

चोरट्यांच्या शोधासाठी अलर्ट
चोरटे धुळे किंवा मध्य प्रदेशच्या दिशेने पळून गेल्याची शक्यता असल्याने टोल नाके आणि धुळे, एमपी कंट्रोल रूमला तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे लाखो रुपयांची रोकड लुटण्यापासून वाचली तर सुरक्षा रक्षक नसल्याचा मुद्दा पुन्हा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. लाखो रुपयांची रोकड असणारे बँकेचे एटीएम सुरक्षा विनाच वार्‍यावर असल्याने चोरट्यांसाठी ही बाब पर्वणी ठरू पाहत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !