शिरपूर मर्चंट को-ऑप बँकेतील 13.75 कोटींच्या अपहार प्रकरणात संचालकाला बेड्या
संशयीताला न्यायालयाने सुनावली चार दिवसांची कोठडी ः 13 संचालक धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर
Director arrested in Shirpur Merchant Co-op Bank embezzlement case of Rs 13.75 crore धुळे (17 जून 2026) : शिरपूर येथील दि शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मधील बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बँकेच्या एका संचालकास अटक केली आहे. तक्रारीनुसार, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, चेअरमन आणि कर्जदार अशा एकूण संशयीतांनी संगनमत करून बँक तसेच सभासद व गुंतवणूकदारांची तब्बल 13 कोटी 75 लाख 86 हजार 253 रुपयांची फसवणूक केल्याने लेखा परीक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे या गंभीर गुन्ह्याचा तपास असून उर्वरित संचालक आता पथकाच्या रडारवर आहेत.
या संशयीतांविरोधात गुन्हा
काशीनाथ सोमा महाजन, राजेंद्र शिवप्रसाद पंडित, तुषार विश्वासराव रंधे, मनोज ओमप्रकाश अग्रवाल, नवनीत गिरधारीलाल राखेचा, महेश जयराम लोहार, साहेबराव भिका महाजन, केवलसिंग बाबूराव राजपूत,
मुकेश ताराचंद अग्रवाल, किरण यशवंत दलाल, रामचंद्र उखा ठाकरे, विनोद शांतीलाल चावडा, पूनम राजेश भंडारी, स्मिता वनीतलाल कोठारी या बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल आहे.
तत्कालीन संचालक मंडळातील एकाला बेड्या
तपासादरम्यान बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळातील 14 जणांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणात किरण यशवंत दलाल (रा.जोशी गल्ली, वरचे गाव, शिरपूर) यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांना मंगळवार, 16 जून 2026 रोजी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देवढे, उपनिरीक्षक सविता गवांदे, अंमलदार रवींद्र माळी, गणेश खैरनार, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, विलास पाटील आदींच्या पथकाने केली.




