शिरपूरात दिव्यांगांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वितरण शिबिर
105 लाभार्थींना विविध उपकरणांसह सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप
Free assistive device distribution camp for the differently-abled in Shirpur. शिरपूर (18 जून 2026) : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दिव्यांग लाभार्थींसाठी मोफत सहाय्यक उपकरणे व सहाय्यक साधनांच्या वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर 15 जून 2026 रोजी आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलात पार पडले.
105 लाभार्थींना मिळाला लाभ
या शिबिरात एकूण 105 दिव्यांग लाभार्थ्यांना विविध प्रकारची सहाय्यक उपकरणे व साधनांचे मोफत वितरण करण्यात आले. ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळतर्फे कॉर्पोरेट सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील एकूण 715 दिव्यांग लाभार्थींना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


या उपक्रमांतर्गत सुमारे 95 लाख रुपयांच्या मदत साहित्याचे वितरण करण्यात येणार असून 15 जून ते 23 जून 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित शिबिरांमधून लाभार्थींना ही उपकरणे प्रदान केली जाणार आहेत.
यांची होती उपस्थिती
उद्घाटन ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे कार्यकारी संचालक निरंजन लाल यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी धुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे महाव्यवस्थापक डॉ.आर.एन.झा तसेच एलिम्कोचे व्यवस्थापक कमलेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांतील मान्यवर, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
गौरवशाली इतिहासाचा मांडला आढावा
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना निरंजन लाल यांनी ऑर्डनन्स फॅक्टरींच्या सुमारे 200 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डपासून यंत्र इंडिया लिमिटेडपर्यंतच्या प्रवासाची माहिती देत त्यांनी भारतीय सशस्त्र दलांसाठी तयार केल्या जाणार्या विविध उत्पादनांची माहिती उपस्थितांना दिली.
दिव्यांग बांधवांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ व यंत्र इंडिया लिमिटेड कटिबद्ध असल्याचे सांगत, भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाबद्दल दिव्यांग लाभार्थी तसेच उपस्थित मान्यवरांनी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ आणि यंत्र इंडिया लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, धुळे यांनी विशेष सहकार्य केले.

