सावकारी परवाना नूतनीकरणासाठी पाच हजारांची लाच : सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक एसीबीच्या जाळ्यात
₹5,000 bribe for moneylending license renewal: Head clerk from Assistant Registrar’s office caught in ACB trap. नाशिक (19 जून 2026) : सावकारी परवान्याच्या नूतनीकरणासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना येवला सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिकास नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील लाचखोर हादरले आहेत. सुधीर गोविंद वाघ (41) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो मुख्य लिपिक पदावर कार्यरत आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचे सावकारी लायसन्स नूतनीकरणासाठी सुधीर वाघ याने यापूर्वीच 60 हजार रुपये उकळले होते व पुन्हा याच कामासाठी सात हजारांची मागणी करण्यात आली. या संदर्भात 16 रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. 18 रोजी तक्रारदाराने वाघ यांची भेट घेतल्यानंतर तडजोडीअंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले व सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार, पोलीस हवालदार शरद हेंबाडे, पोलीस नाईक युवराज खांडवी, चालक व पोलीस शिपाई समीर शेख आदींनी यशस्वी केला. तपास पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.
लाचखोरांविरोधात एसीबीचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचार्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.

