हलखेड्यात टोळ्या पुन्हा सक्रिय : ठाण्यातील व्यापार्याला स्वस्तात भंगाराच्या आमिषाने पिस्टल लावून चार लाखांचा ऐवज लुटला
व्यापार्यासह साथीदारांना नग्न करीत व्हिडिओही बनवला : 15 जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा
Gangs active again in Halkhed: A trader from Thane was robbed of valuables worth four lakh rupees after being lured with the promise of cheap scrap and held at gunpoint मुक्ताईनगर (19 जून 2026) : स्वस्तात अॅल्युमिनिअम (भंगार) देण्याच्या बहाण्याने ठाण्यातून आलेल्या व्यापार्यासह त्याच्या साथीदारांना गावठी पिस्टल लावत मारहाण करीत त्यांना नग्न करण्यात आले व व्हिडिओ काढून व्यापार्यासह साथीदारांकडील चार लाख एक हजार पाचशे रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. हलखेडा, ता.मुक्ताईनगर येथे ही धक्कादायक घटना 8 जून रोजी सकाळी सहा वाजता घडली. व्यापार्याने शांतीनगर, जि.ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो कार्यक्षेत्र मुक्ताईनगर असल्याने वर्ग करण्यात आला.
काय आहे प्रकरण
अस्ताफ हुसेन अब्दुल सत्तार अन्सारी (50, भिवंडी, जि.ठाणे) यांच्यासह साथीदार स्वस्तातील अॅल्युमिनिअम मिळणार असल्याच्या आमिषाने भाळले व ते साथीदारांसह 8 जून रोजी हलखेडा, ता.मुक्ताईनगर येथे आले. यावेळी संशयीतांनी पिस्टलाचा धाक दाखवत मारहाण करीत दोन लाख 55 हजार 500 रुपयांची रोकड, 30 हजार पाचशे रुपयांचे मोबाईल, बोटातील चांदीची अंगठी असा चार लाख एक हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला.


पिस्टल लावून बनवला व्हिडिओ
यावेळी आरोपींनी तक्रारदारासह त्यांच्या साथीदाराला मारहाण केली तसेच पिस्टल दाखवून नग्न व्हिडिओ काढला व तक्रार न करता सरळ घरी जाण्याची धमकी दिली. व्यापारी व सहकारी धास्तावल्याने त्यांनी मुक्ताईनगरात तक्रार न देता सरळ घर गाठले व नंतर शांतीनगर पोलिसात तक्रार नोंदवली. हा गुन्हा तपासार्थ मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी शिवा व त्याच्या 15 ते 20 साथीदारांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक आशिष आढसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहेत.
पुन्हा टोळ्या सक्रिय
यापूर्वीही हलखेडा येथे व परिसरात स्वस्तात कॉपर, नागमणी, दोन तोंडी मांडूळ, हळद यासह विविध प्रकारची प्रलोभने दाखवून परराज्यातील व्यापार्यांना लुटण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. पोलिसांनी अनेकदा आरोपींवर कारवाई केल्यानंतर आता पुन्हा टोळ्या सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

