मुक्ताईनगर तालुक्यात आजवरचे सर्वात मोठे ‘ऑपरेशन ड्राप आऊट’ : 20 लाखांची रोकड, 300 ग्रॅम सोने, चार किलो चांदी, दोन कट्टे व प्राण्यांच्या कातडी जप्त
मध्यरात्रीच्या कोम्बिंगमध्ये 56 संशयीत पोलिसांच्या ताब्यात : अनेक गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपींना अटक : पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे दणाणले धाबे
गणेश वाघ
Muktainagar Taluka’s biggest-ever ‘Operation Drop Out’: Cash worth ₹20 lakh, 300 grams of gold, four kilograms of silver, two country-made pistols, and animal skins seized. मुक्ताईनगर (19 जून 2026) : सोशल मिडीयात आकर्षक जाहिरातीच्या माध्यमातून कधी दोन तोंडी मांडूळ तर कधी स्वस्तातले भंगार वा जुने सोने वा सेकंड करन्सी सापडल्याच्या भूलथापा मारून परप्रांतीय व्यापार्यांना बोलावून नंतर त्यांना मारहाण करीत गंडवण्याच्या घटना गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या. आरोपी पीडीतांचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढून त्यांना पिस्टल लावून धमकावत असल्याने तक्रारदार समोर येत नव्हते मात्र अलीकडेच झालेल्या एका गुन्ह्यानंतर नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही बाब गांभीर्याने घेत तब्बल 200 कर्मचार्यांच्या ताफ्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावात शुक्रवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन ड्राप आऊट’ राबवले. या मोहिमेत आरोपींच्या घरातून पोलिसांना कुबेराचा खजिनाच सापडला तर वर्षानुवर्षे फसवणूक करणार्या टोळ्याच्या गोटात या कारवाईने चांगलाच थरकाप उडाला.
पाच गावांमध्ये ‘ऑपरेशन ड्राप आऊट’ : कोट्यवधींचा खजिना जप्त
जळगाव जिल्हा पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये शुक्रवारी पहाटे एकाचवेळी पोलिसांनी दोनशे कर्मचार्यांसह ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहिम राबवली. संशयीत आरोपींच्या घरातून यावेळी 20 लाखांची रोकड, 300 ग्रॅम सोने (किंमत 30 लाख रुपये), चार किलो वजनाचे चांदीचे दागिने (किंमत आठ लाख रुपये), दोन गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस, एक नग हरणाचे कातडे, एक नग कोल्ह्याचे कातडे, एक नग खरगोशचे कातडे, चार चारचाकी वाहने तसेच सहा दुचाकी व 30 मोबाईल फोन जप्त करण्यात आले.


तीन वर्षात टोळ्यांनी केले 50 वर गुन्हे
सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, सुलैमानी दगड यांसारख्या कथित मौल्यवान वस्तूंचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात होती. आरोपी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत. त्यानंतर ग्राहकांना गावात बोलावून बनावट वस्तू किंवा खोट्या नोटा दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करीत होते शिवाय विरोध करणार्यांना मारहाण, धमक्या आणि खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची भीती दाखवली जात होती. गेल्या तीन वर्षांत या परिसरात 20 दरोडे, एक खुनाचा प्रयत्न, एक खून, सात जबरी चोरी, 26 फसवणुकीचे गुन्हे, एक दरोड्याचा प्रयत्न आणि दोन सरकारी नोकरांवरील हल्ले नोंदविले गेले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम आखून एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या.
11 कुख्यात आरोपींना अटक
फरेज राजु पवार (40, रा.मधापुरी), रामजाने राईसाहेब भोसले (32, रा.हलखेडा), आक्काबाई जोगिंदर भोसले (32, रा.हलखेडा), रोहित सुदेश पवार (वय 32, रा.मधापुरी), राजकिसन जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवकिसन जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले, गांझी दरियासिंग भोसले (हलखेडा जुने), विलास नरविलाल पवार आणि अजय दादा पवार (दोघे रा. हलखेडा) या आरोपींना जुन्या गुन्ह्यात अटक करण्यात आली तर त्यांच्याकडून प्राण्यांची कातडी, शस्त्रे, रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
यांचा कारवाईत सहभाग
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, परिवेक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत देवकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर निरीक्षक आशिष अडसुळ, भुसावळ शहर निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ तालुका निरीक्षक निलेश गायकवाड, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, बोदवड निरीक्षक आशिष लव्हांगळे, सावदा एपीआय विशाल पाटील, नशिराबाद एपीआय योगिता नारखेडे, निंभोरा एपीआय मीरा देशमुख, वरणगाव एपीआय अमितकुमार बागुल यांच्यासह 200 पोलीस अंमलदार सहभागी झाले.

