जैताणे ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घालून डॉक्टरांसह पोलिसांसोबत अरेरावी : त्रिकूटाला पोलिसांकडून अटक

शासकीय कामात अडथळा आणणार्‍यांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी


Trio arrested for creating a ruckus and behaving insolently with doctors and police at Jaitane Rural Hospital धुळे (19 जून 2026) : साक्री तालुक्यातील जैताणे गावातील नवीन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफशी गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या तसेच पोलिसांशी दमदाटी व मारहाण करणार्‍या तिघा आरोपींना निजामपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर एका पसार संशयीताचा कसून शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी मध्यरात्री सुमारे 12.45 वाजता जैताणे येथील नवीन ग्रामीण रुग्णालयात काही व्यक्ती वैद्यकीय अधिकारी मोनाली कोठावदे व नर्सिंग स्टाफ यांच्याशी वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर निजामपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले मात्र तेथे उपस्थित सनी बोरसे, दीपक जाधव, शाम न्याहळदे व बापू धनगर (सर्व रा. जैताणे) यांनी पोलिसांशीही हुज्जत घालत दमदाटी व मारहाण केली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



संशयीतांच्या आवळल्या मुसक्या
प्रभारी अधिकारी एपीआय मयूर भामरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गुरुवार, 18 जून रोजी सनी त्र्यंबक बोरसेसह दीपक कैलास जाधव आणि शाम छोटू न्याहळदे यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्ह्यातील चौथा आरोपी बापू नानाभाऊ धनगर हा अद्याप पसार आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मयूर भामरे, एपीआय प्रियदर्शनी थोरात, उपनिरीक्षक मधुकर सोमोसे, प्रदीपकुमार आखाडे, नारायण माळचे, रतन मोरे, सुजीत देवरे, राकेश महाले, टीलू पावरा, गौतम अहिरे, वारलवाड आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !