पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर भरती : धुळ्यातील ‘आत्मा’चा माजी प्रकल्प संचालक एसीबीच्या जाळ्यात
बोगस नियुक्तीपत्र देत उमेदवारांकडून आई-वडिलांच्या खात्यात 16 लाख 85 हजार स्वीकारले :आर्थिक लाभासाठी शासनाचे नुकसान
गणेश वाघ
Illegal recruitment through abuse of office: Former Project Director of Dhule’s ‘ATMA’ caught by ACB भुसावळ (19 जून 2026) : धुळ्यातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे तत्कालीन प्रकल्प संचालक बबन नथ्थू पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गट तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान अधिकारी पदांची बेकायदेशीर भरती केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे बबन पाटील यांनी आपल्या आई-वडिलांच्या खात्यात भरती प्रक्रियेतील उमेदवारांकडून तब्बल 16 लाख 85 हजार रुपये स्वीकारल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले आहे. धुळे एसीबीच्या या कारवाईने शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार्यांचे धाबे दणाणले आहे.
काय आहे प्रकरण ?
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) येथे तत्कालीन प्रकल्प अधिकारी असलेल्या बबन पाटील यांनी 5 डिसेंबर 2015 ते जुलै 2018 या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर केला. शासन आदेश नसतानाही बेकायदेशीररित्या गट तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान अधिकारी या पदांची भरती करण्यात आली. गट तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान अधिकारी या पदावर नेमणूक देण्यासाठी आपल्या आई-वडीलांच्या खात्यात तब्बल 16 लाख 85 हजार रुपये स्वीकारले व बनावट नियुक्तीपत्रे देवून शासनाची व उमेदवारांची फसवणूक केली. शासकीय पदाचा दुरुपयोग करून शासनाचे नुकसान केल्याने धुळे एसीबीने चौकशी करून शुक्रवारी सायंकाळी मोहाडी पोलिसात आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, सागर माळी, चंद्रकांत सैंदाणे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली.
