धक्कादायक : सेवानिवृत्त एसीपीकडून सुनेकडे शारीरीक संबंधाची मागणीचा गंभीर आरोप : सात संशयीताविरोधात गुन्हा
पुणे (20 जून 2026) : 30 वर्षीय सुनेकडे सेवानिवृत्त एसीपीने शारीरीक सुखाची मागणी केली तसेच कुटूंबियांनी शारीरीक मानसिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने करीत या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. पती, सासू आणि नणंदांसह सात जणांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला वेग दिला आहे.
सेवानिवृत्त एसीपीवर गंभीर आरोप
कोंढवा पोलीस ठाण्यात 30 वर्षीय विवाहितेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. निवृत्त एसीपी सुरेश रामचंद्र घाडगे, त्यांचा मुलगा विक्रांत घाडगे, पत्नी सुनंदा घाडगे, नणंद स्नेहल सर्जेराव, प्रवीण सर्जेराव, वैशाली राऊत आणि विक्रम राऊत अशी गुन्हा दाखल झालेल्या सात संशयीतांची नावे आहेत.



असे आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून उपसचिव पदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून विक्रांत घाडगे यांचे स्थळ आले होते. नोव्हेंबर 2021 मध्ये विमाननगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा झाला, तर एप्रिल 2022 मध्ये त्यांचा विवाह सासवड येथे पार पडला. साखरपुडा आणि विवाहाचा सर्व खर्च तसेच मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने मुलीच्या पालकांकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विवाहितेला घरात कोंडले
विवाहानंतर सासूने फिर्यादीचे सर्व दागिने स्वतःकडे ठेवले. पती घरातून बाहेर जाताना पत्नीला घरात कोंडून ठेवत असे. तिला नोकरी करण्यापासून रोखण्यात आले आणि तिची सोशल मीडिया खातीही बंद करण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच, माहेरचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांचाही अपमान केला जात होता, असे फिर्यादीत नमूद आहे.
निवृत्त अधिकार्याकडून धमकी : शारीरीक संबंधाची मागणी केल्याचा गंभीर आरोप
फिर्यादीनुसार, निवृत्त एसीपी असलेले सासरे सुरेश घाडगे वारंवार धमक्या देत असत. मी एसीपी होतो, पुरावे कसे नष्ट करायचे हे मला माहीत आहे, असे सांगून ते दडपण आणत होते. विरोध केल्यास कोयत्याने कापून टाकण्याची धमकीही त्यांनी दिली होती, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
याव्यतिरिक्त, पती, सासू आणि नणंदांकडून विविध कारणांवरून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. सासर्यांनी शारीरिक संबंधांची मागणी केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

