ट्रक चालकावर दगडफेक व चाकूने हल्ला करीत लूट : कुख्यात टोळी जळगाव तालुका पोलिसांच्या जाळ्यात
12 तासांत गुन्ह्याची उकल : टोळीतील म्होरक्यासह दोघे अट्टल गुन्हेगार
Truck driver robbed after being pelted with stones and attacked with a knife: Notorious gang falls into Jalgaon Taluka Police’s netजळगाव (20 जून 2026) : जालन्यातील ट्रक चालकावर दगडफेक करीत चाकूने हल्ला करीत त्याला लुटण्यात आल्याची घटना जळगाव तालुका हद्दीतील जळगाव-भुसावळ मार्गावर 20 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली होती. जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत गुन्ह्याची उकल करीत त्रिकूटाला बेड्या ठोकल्या. टोळीतील म्होरक्यांसह दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर एका एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कशी घडली घटना?
फिर्यादी व ट्रक चालक मुकेश रामराव राठोड (30, गांधी चौक, हरिओम नगर जालना) हे 20 जून रोजी रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास ते त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्रमांक एम.एच.21बी.एच.3536) घेऊन पाळधीजवळून जात असताना चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवत आधी ट्रकवर दगडफेक केली तसेच ट्रक चालकासह क्लीनरला मारहाण करीत यावेळी ट्रक चालकाच्या उजव्या हातावर चाकूने तीन वेळा वार करण्यात आले. आरोपींनी चालकाच्या खिशातील पाच हजार पाचशे रुपयांची रोकड व मोबाईल फोन पे द्वारे 984 रुपये जबरदस्तीने ट्रान्सपर केले व पळ काढला. चालकाने जळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ धाव घेतल्यानंतर पोलिसांकडे कैफियत मांडली.



जळगाव तालुका पोलिसांची तातडीची कारवाई
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपींचा शोध घेत तीन आरोपींना अटक केली तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या (26, पाळधी, भवानी मंदिरासमोर, ता.धरणगाव), विशाल चुडामण पाटील (18, हॉटेल साई पॅलेसमागे, बिबा नगर, जळगाव) व मोहित हेमंत गुजर (19, प्लॉट नं. 45, मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
दोघे आरोपी कुख्यात
जळगाव तालुका पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी साहिल शेख जब्बार शेख उर्फ काल्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी धरणगाव पोलीस ठाण्यात बस अडवून चालकास मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी विशाल चुडामण पाटील याच्याविरुद्धही रामानंद नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका निरीक्षक शशिकांत पाटील, सहा.निरीक्षक नयन पाटील, हवालदार प्रदीप राजपूत, हवालदार योगेश पाटील, हवालदार अविनाश देवरे, कैलास इंगळे, चालक पंकज देशमुख, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे, गणेश पाटील आदींच्या पथकाने केली.

