कोळन्हावीतील तरुणाच्या खुनात होमगार्डचा सहभाग : तिघा आरोपींची कोठडीत रवानगी


यावल (23 जून 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तरुणाची हत्या करून अपघाताचा बनाव करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक संशयीत यावल येथे होमगार्ड असून अटकेतील तिघांना यावल न्यायालयाने 25 जूनपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यागुन्ह्याच्या तपासाकामी एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

काय आहे नेमके प्रकरण ?
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील पवन रवींद्र सोळंके (26) याची किनगाव-डांभुर्णी रस्त्यादरम्यान असलेल्या हतनूरच्या पाटचारीजवळ होमगार्ड उमेश दिलीप परदेशी (32, रा.कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (32) व लोकेश दिवाकर महाजन (32, रा.डांभूर्णी) या तिघांनी हत्या केली होती. दिशाभूल करण्यासाठी पवनचा अपघात झाल्याचा बनाव केला होता. ही घटना रविवार, 17 जूनच्या मध्यरात्री नंतर घडली होती. डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, वासुदेव मराठे या पथकाने चौकशी केली. त्यात तिन्ही संशयितांचे पितळ उघडे पडले. तिघांविरुद्ध यावल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला. शनिवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी तिघांना 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तिघांपैकी एक संशयित होमगार्ड, अन्य एक ताब्यात
या गुन्ह्यातील संशयित उमेश दिलीप परदेशी हा होमगार्ड आहे. तो यावल पोलिस ठाण्यातच विविध बंदोबस्तासाठी नेमणुकीला असतो. या गुन्ह्याच्या तपासाकामी कोळन्हावी येथील एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचे नेमके कारण पोलिस शोध घेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !