नशिराबाद गावातील विवाहितेच्या खुनाचे समोर आले धक्कादायक कारण
Shocking reason behind the murder of a married woman from Nashirabad village revealed भुसावळ (23 जून 2026) : भुसावळ-जळगाव महामार्गावरील नशिराबाद गावातील 28 वर्षीय विवाहितेचा पतीने कोयत्याने हल्ला करीत निर्घृण खून केला होता. अत्यंत धक्कादायक घटना सोमवार, 22 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आठवडे बाजारातील खंडेराव मंदिराच्या ओट्यावर घडली होती. सुरूवातीला हा खून कौटुंबिक कलहातून झाल्याची माहिती होती मात्र पोलिस तपासानंतर आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यातून झालेल्या वादानंतर हा खून झाल्याचे तक्रारीअंती समोर आले आहे.
काय घडले नशिराबाद गावात ?
नशिराबाद गावातील भवानी नगरातील रहिवासी विवाहिता मंदा विकास जाधव (28) यांचा पती विकास जगन जाधव (35) याने डोक्यावर कोयत्याचे वार करीत खून केला होता. आरोपी पती विकास हा पत्नी मंदाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्यात वाद सुरू होते. सोमवार, 22 रोजी दुपारी एक ते दिड वाजेदरम्यान दाम्पत्यात वाद झाल्यानंतर संतप्त पतीने घरातील कोयत्याने पत्नीच्या डोक्यावर वार केल्याने तिचा मृत्यू झाला. आठवडे बाजारातील खंडेराव मंदिराच्या ओट्यावर ही घटना घडली.

पोलिस अधिकार्यांची घटनास्थळी धाव
जळगाव अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, भुसावळ विभागाचे उपअधीक्षक केदार बारबोले यांच्यासह नशिराबाद प्रभारी योगिता नारखेडे यांच्यासह सहकार्यांनी धाव घेत पाहणी केली. यावेळी संशयीत आरोपी पतीला अटक करण्यात आली. विशाल जीवराम मोरे (27, नशिराबाद) यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास जगन जाधवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय योगिता नारखेडे करीत आहेत.

