मध्यप्रदेशातील टोळीचा शहाद्यात धुमाकूळ : नंदुरबार गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर 15 गुन्ह्यांची उकल
आंतराज्यीय टोळीकडून चोरीच्या 14 दुचाकी जप्त तर शहादा हद्दीतील आठ गुन्ह्यांची उकल
गणेश वाघ
Gang from Madhya Pradesh wreaks havoc in Shahada; 15 crimes solved following Nandurbar Crime Branch action.भुसावळ (23 जून 2026) : शहादा परिसरात घरफोडी व मोटारसायकल चोरीच्या घटना घडविणार्या आंतरराज्यीय सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून आठ लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या अटकेनंतर शहादा हद्दीतील आठ घरफोडीचे तर सात दुचाकी चोरीचे मिळून एकूण 15 गुन्हे उघडकीस आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम राबविली. नंदुरबार गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर मध्य प्रदेशातून शहादा परिसरात येणार्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुक्राम कंगरसिंह वास्केल (बघेल, 22, झाई, नरवाली, कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश) व संजय सुमलसिंह वसुनिया (22, बुराडिया, नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश) अशी आहेत.

चोरीच्या 14 दुचाकी जप्त : शहाद्यातील सहा गुन्ह्यांची उकल
अटकेतील आरोपींकडून चोरीच्या 14 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत सहा लाख 75 हजार रुपये आहे. शहादा हद्दीतील सहा तर खेतिया हद्दीतील एका गुन्ह्याची उकल या निमित्ताने झाली असून अन्य दुचाकींबाबत चेसीस व इंजिन क्रमांकावरून माहिती काढण्यात येत आहे. आरोपींनी चोरी केलेल्या दुचाकी शहाद्यातील कारखाना परिसरात लपवून ठेवल्यानंतर त्या जप्त करण्यात आल्या.
घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीस
अटकेतील आरोपी अट्टल असून त्यांच्या अटकेनंतर घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. शहादा हद्दीतील सात तर अमरावतील हद्दीतील एका गुन्ह्याचा त्यात समावेश आहे. विविध घरफोडी प्रकरणांतील एक लाख 48 हजार रुपयांची रोकड आरोपींच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पुरूषोत्तम सोनार, विकास कापुरे, शोएब शेख, भरत उगले, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, सतीश घुले आदींच्या पथकाने केली.

