व्हॉटसअॅपवर आलेली एपीके फाईल तुमचे बँक खाते करील रीकामे : भुसावळातील तिघांना 3.88 लाखांचा फटका
सायबर भामट्यांचा नवीन उद्योग : लग्नाच्या निमंत्रणाखाली एपीके फाईलद्वारे फसवणुकीचा नवा प्रकार : नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
APK file received on WhatsApp could empty your bank account: Three people from Bhusawal lose ₹3.88 lakh भुसावळ (24 जून 2026) : सायबर गुन्हेगार नागरिकांना गंडवण्याच्या विविध क्लृप्त्या अवलंबत आहेत. तयात आता सोशल मिडीयातील लोकप्रिय व्हॉट्सअॅपद्वारे एपीके फाईल पाठवून थेट संबंधिताचे बँक डिटेल्स मिळवून त्यातून रक्कम लांबवण्याचे प्रकार समोर येत आहेत. भुसावळातील तिघांच्या व्हॉटसअॅपवर अशाच पद्धत्तीने फाईल आल्यानंतर ती डाऊनलोड करताच त्यांचा मोबाईल हॅक होवून बँक खात्यातील तब्बल तीन लाख 88 हजार 327 रुपयांची रक्कम उडवण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात सेवानिवृत्त शिक्षिकेसह तिघांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय घडले शहरात ?
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरीनगरातील मुनिजा कौसर फरीदखान पठाण (63) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांना 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी व्हॉट्सअॅपवर ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून ‘लग्नाचे आमंत्रण’ असल्याचा संदेश आला. त्या संदेशासोबत ‘वेडींग इन्व्हीटेशन एपीके’ नावाची फाईल होती. ओळखीच्या व्यक्तीकडूनच संदेश आल्याचा समज करून त्यांनी ती फाईल उघडली.

व्हॉटसअॅपवर एपीके फाईल डाऊनलोड केल्यास खाते होईल रिकामे
फाईल उघडल्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल बंद झाला व पुन्हा सुरू झाल्यानंतर 11 एप्रिल रोजी त्यांना मोठ्या प्रमाणात ओटीपी संदेश येऊ लागले तसेच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर अनोळखी गटही तयार झाल्याचे दिसून आले. 12 एप्रिल रोजी त्या बाहेरगावी गेल्या असताना रात्रीपर्यंत सर्व काही सुरळीत होते मात्र दुसर्या दिवशी सकाळी मोबाईल तपासला असता त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचे लक्षात आले. तपासणी केली असता त्यांच्या खात्यातील एकूण चार लाख 24 हजार 503 रुपयांपैकी एक लाख 70 हजार रुपये, त्यानंतर 48 हजार 327 रुपये आणि पुन्हा एक लाख 70 हजार रुपये असे एकूण तीन लाख 88 हजार 327 रुपये काढून घेतल्याचे उघड झाले. या घटनेनंतर त्यांनी जळगाव येथील सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
अन्य दोघांचीही याच पद्धत्तीने फसवणूक
दरम्यान, भुसावळातील शेख शफीउद्दीन शेख नसीरुद्दीन तसेच शोएब रजा गुलाम सरवर यांनाही अशाच प्रकारे ‘एपीके’ फाईल पाठवून गंडवण्यात आले. तिघांच्या प्रकरणात एकाच टोळीचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी व्हॉट्सअॅपवर येणार्या अनोळखी ‘एपीके’ फाईल्स किंवा लिंकवर क्लिक करू नये. अशा प्रकारच्या संदेशांपासून सावध राहून तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
