चाळीसगावात कोम्बिंग : महिलेच्या घरातून 18 तलवारींसह 10 चॉपर, चाकू जप्त

44 सराईत आरोपी ताब्यात : 39 लाखांची तीन वाहने जप्त : पकड वॉरंटमधील आठ संशयीत ताब्यात


Combing operation in Chalisgaon: 18 swords and 10 choppers/knives seized from a woman’s house चाळीसगाव (24 जून 2026) : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चाळीसगावात नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बुधवार, 24 जून रोजी रात्री दोन ते पहाटे चारदरम्यान पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत सराईत गुन्हेगारांची तपासणी, वॉरंट बजावणी, वाहनांवर कारवाई तसेच अवैध धंद्यांविरोधात धडक मोहिम हाती घेण्यात आली. कोम्बिंगदरम्यान एका महिलेच्या घरातून तब्बल 19 तलवारी तसेच 11 धारदार चाकू, गुप्ती व चॉपर जप्त करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

44 संशयीत चौकशीकामी ताब्यात
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील एकूण 80 आरोपी तपासल्यानंतर गुन्हेगारांची पडताळणी करून त्यांच्या घरांची झडती घेतली. यापैकी 44 आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.





तलवारीसह चाकू जप्त
पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, शहरातील नवनाथ नगरातील आरती किरण देठे (मूळ रा.इंदिरा नगर, चाळीसगाव) व महेंद्र रंगनाथ हतांगळे (नारायणवाडी, चाळीसगाव) यांनी भाडे तत्वावरील घेतलेल्या घरातून 18 तलवारी तसेच 10 धारदार चाकू, गुप्ती व चॉपर जप्त केले. ही शस्त्रे कुठून व कुणी, कोणत्या उद्देशाने आणली? याची शहर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 अंतर्गत उभयंतांविरोधात गुन्हा दाखल केला.

या शिवाय फरीद खान शाबीर खान (नागद रोड, झोपडपट्टी, चाळीसगाव) याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणीदेखील स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन महागडी वाहने जप्त
याशिवाय मुंबई पोलीस अधिनियम कलम 124 अन्वये संशयास्पद आढळलेल्या 39 लाख रुपये किमतीच्या तीन चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात व्हॅगन आर (क्रमांक एम.एच.20 ई.जे.4890), ऑडी (क्रमांक एम.एच.14 ई.पी.7358) व वरना (एम.एच.43 ए.आर.3409) या वाहनांचा समावेश आहे.

कोम्बिंगदरम्यान पोलिसांनी एकूण आठ पकड वॉरंटची बजावणी केली. तसेच प्रोहिबिशन कायद्यान्वये तीन प्रकरणांमध्ये कारवाई करून कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. याशिवाय तीन व्यक्तींना समन्स बजावण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक अमित मनेळ यांच्यासह सहकार्‍यांनी केली.

गुन्हेगारीला पायबंद लावण्यासाठी कारवाई : जिल्हा पोलीस अधीक्षक
चाळीसगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !