पाचोर्यात वीज शॉकने माजी नगरसेवक पूत्राचा मृत्यू
पाचोरा (25 जून 2026) : कट झालेल्या वीज सर्व्हिस वायरचा शॉक लागून माजी नगरसेवक पूत्राचा शहरात मृत्यू झाला. ही घटना शहरातील हिंद ऑईल मिल रोड परिसरात बुधवारी सकाळी घडली. लोकेश जडे (23) असे मृताचे नाव असून तो माजी नगरसेवक दत्तात्रय जडे यांचा पुत्र होय.
काय घडले पाचोरा शहरात
हिंद ऑईल मिल रोड परिसरातील जडे कुटुंबाच्या घराजवळील वीज खांबावरून घराला वीजपुरवठा करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी लोकेश जडे हा घराबाहेरील लोखंडी जिन्याने वरच्या मजल्यावर जात असताना कट झालेल्या सर्व्हिस वायरचा त्याच्या खांद्याला स्पर्श झाला. त्यावेळी परिसरात पाऊस सुरू असल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो जिन्यावरून खाली कोसळला.


घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी त्याला तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकार्यांच्या खबरीवरून पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शहरात यापूर्वीही विजेचा शॉक लागून अनेक दुर्घटना घडल्या असतानाही जीर्ण झालेल्या तारा, सैल वायर आणि धोकादायक वीज यंत्रणेची वेळेवर दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक भागांत तसेच महाविद्यालय परिसरालगत उच्चदाब वीज वाहिन्या आणि मुख्य वीजपुरवठा वाहिन्या घरांच्या अत्यंत जवळून जात आहेत. पावसाळ्यात यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सर्वेक्षणाची मागणी
लोकेश जडे यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी संपूर्ण शहरातील वीज यंत्रणेचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. कट झालेल्या सर्व्हिस वायर, जीर्ण तारा, धोकादायक खांबे आणि घरांजवळून जाणार्या वीजवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
