भुसावळातील रेल्वेच्या तिकीट निरीक्षकावर हल्ला : स्थानिक आरोपी ताब्यात


Attack on railway ticket inspector in Bhusawal : Local accused taken into custody भुसावळ (28 जून 2026) : एसी कोचमध्ये जागा न मिळाल्याच्या रागातून स्थानिक प्रवाशाने रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षकावर हल्ला केल्याची घटना रेल्वे स्थानकावर शनिवार, 27 रोजी रात्री 10.20 वाजेच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या हल्ल्यात रेल्वेचे हेड टीटी चुन्नीलाल गुप्ता किरकोळ जखमी झाले तर झटापटीत गुप्ता यांचे 88 हजारांचे नुकसान झाले. भुसावळ लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी मनीष लक्ष्मणदास शंभानी (36, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

जागा न मिळाल्याच्या वादातून हल्ला
तक्रारदार चुन्नीलाल रमेशचंद्र गुप्ता (49) हे भुसावळ येथे हेड टीटीई म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री त्यांची गाडी क्रमांक 11203 नागपूर-मडगाव एक्सप्रेसमध्ये भुसावळ-पनवेल दरम्यान एसी कोच तपासणीची ड्युटी होती. शनिवारी रात्री सुमारे 10.20 वाजता गाडी भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आल्यानंतर संशयीत मनीष शंभानी हा त्यांच्याकडे आला आणि एसी कोचमध्ये जागा देण्याची मागणी केली मात्र ट्रेनमध्ये आरएसी असल्यामुळे जागा उपलब्ध नसल्याचे टीटीईने सांगितले.



यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने प्रथम अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर एका प्रवाशाशी टीटीई बोलत असताना आरोपीने अचानक त्यांच्या उजव्या गालावर व डोळ्याखाली जोरदार ठोसा मारला तसेच छाती व बरगड्यांवरही मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीमुळे टीटीईच्या डोळ्याखाली जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला. धक्काबुक्कीमध्ये त्यांच्या हातातील बॅग खाली पडली. त्यामध्ये असलेला सरकारी टॅबलेट, ईएफटी बुक, चष्मा, ओळखपत्र आणि गळ्यातील सोन्याची चैन यांचे मिळून सुमारे 88 हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरपीएफ जवानांनी आरोपीला पकडले
घटनेची माहिती मिळताच साध्या व गणवेशातील आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले मात्र आरोपीने स्वतःचे टी-शर्ट फाडून मेरा बायपास हुआ है असा आरडाओरडा करत पळून जाण्याचाही प्रयत्न केला. लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्यास नोटीस देवून सोडण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनराज सुधाकर लुले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !