अकोला एसीबीने ट्रॅप केलेल्या सहाय्यक जिल्हा निबंधकाचे जळगावात घर फोडताना दोघे पोलिसांच्या जाळ्यात

संशयीत आरोपी निघाले सहाय्यक जिल्हा निबंधकाचे नातेवाईक : नागरिकांच्या सतर्कतेने गैरप्रकार टळला


गणेश वाघ
Two individuals were caught by the police while breaking into the Jalgaon residence of an Assistant District Registrar who had previously been trapped by the Akola ACB जळगाव (28 जून 2026) : अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रकरणात अटक केलेल्या सहाय्यक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-1) किरण पुरुषोत्तम चौधरी यांचे जळगावातील घर एसीबीने सील केल्यानंतर दोन संशयीत हे घर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना कळताच यंत्रणेने धाव घेत संशयीताना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे अटकेतील संशयीत हे आरोपी अटकेतील सहाय्यक जिल्हा निबंधकाचे नातेवाईक निघाल्याने या प्रकरणातील संशय कल्लोळ अधिकच वाढला आहे.

असे आहे लाच प्रकरण
खास सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्यातील सहाय्यक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना 25 रोजी दहा हजारांची लाच घेताना कार्यालयातच अटक केली होती तर आरोपीचे घर हे जळगावातील साईप्रभा आर्केड, गणेश कॉलनी येथे असल्याने हे घर पुढील घरझडतीसाठी एसीबी, जळगावच्या पथकाने सीलबंद केले होते.



पोलिसांची धाव अन आरोपी जाळ्यात
दरम्यान, शनिवारी रात्री या घरातून काहीतरी आवाज येत असल्याची व घराबाहेरील दिवे सुरू असल्याची माहिती शेजार्‍यांनी एसीबी अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराच्या पाठीमागील बाजूने शिडी लावून आत प्रवेश केलेल्या दोन इसमांना रंगेहात पकडण्यात आले. अटकेतील आरोपींमध्ये प्रसाद वसंत नारखेडे (33, रा.डांभूर्णी, ता.यावल) व प्रवीण अशोक महाजन (36, रा.गणेश कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी निघाले ट्रॅप अधिकार्‍याचे नातेवाईक
विशेष म्हणजे जळगावात पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे अकोला लाच प्रकरणात अटकेतील किरण चौधरी यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे सील केलेल्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न आरोपी लोकसेवकाच्या सांगण्यावरून करण्यात आला होता का? घरातील रोकड, कागदपत्रे किंवा मौल्यवान वस्तू एसीबीच्या हाती लागू नयेत, यासाठी हा डाव रचण्यात आला होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचे किरण चौधरी यांच्याशी नेमके काय संबंध आहेत? या सर्व बाबींचा पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !