भुसावळ तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था
भुसावळ (30 जून 2026) : भुसावळ तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाल्याने कामे घेवून आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. तहसील प्रशासनाने या संदर्भात दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अस्वच्छतेचा त्रास केवळ नागरिकांनाच नाही तर तहसीलमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनाही सोसावा लागत आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे या दुर्गंधीने गंभीर रूप धारण केले आहे.
स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
भुसावळ तहसील कार्यालयातील नागरिक आणि कर्मचार्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची (लघुशंका व संडास) अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे तिथे येणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना आपल्या कामासाठी तासनतास इथे थांबावे लागते, मग या दुर्गंधीचा त्रास त्यांनी का सहन करायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


नागरिकांना सुविधा क्रमप्राप्त
भुसावळ तहसील कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक हा या देशाचा सन्माननीय करदाता आहे. त्याला मूलभूत आणि स्वच्छ सुविधा मिळणे हा त्याचा हक्क आहे. तहसीलमधील स्वच्छतागृहांची दुरूस्ती न झाल्यास नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता यत नाही. तहसीलदार व प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ता प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.
