जामनेरातील 13 लाखांची घरफोडी उघड : स्थानिक त्रिकूट जाळ्यात
सहा लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त: गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
Jamner burglary worth ₹13 lakh solved ; local trio nabbed जामनेर (4 जुलै 2026) : जामनेरात बंद घर पाहून चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत 13 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले होते. जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपासचक्रे फिरवून स्थानिक त्रिकूटांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून चोरीतील सहा लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
काय घडले जामनेरात ?
जामनेरातील मौलवी मसुद अक्तर मुजफर हुसेन (50, रा.मदनीनगर, प्लॉट क्र. 42, जामनेर) हे 25 जून रोजी रात्री कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली व 29 जून रोजी हुसेन हे सकाळी घरी परतल्यानंतर त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील 9 लाख 23 हजार रुपये किंमतीचे 30.01 ग्रॅम सोन्याचे दागिने, 12 भार चांदीचे दागिने तसेच चार लाखांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले.
रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. जामनेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिकांच्या माहितीवरून आरोपींचा माग काढला
घरफोडीनंतर स्थानिक नागरिकांनी रेकॉर्डवरील आरोपी शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर (24, रा. बीएसएनएल टॉवर, मदनीनगर, जामनेर) याला त्याच्या साथीदारांसह परिसरात फिरताना पाहिल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर शेख समीरला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद फातिर उर्फ गोलू मिया तुफेल मोहम्मद (20, रा. मदनीनगर, जामनेर) याला जामनेरातून तर शेख अमीर शेख जाकीर (19, रा.बीएसएनएल टॉवर, जामनेर) याला नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या.
सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त
तपासादरम्यान आरोपींकडून चोरीतील 30.01 ग्रॅम सोन्याचे दागिने, 12 भार चांदी, 71 हजार 500 रुपयांची रोख रक्कम तसेच 30 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण सहा लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस शिपाई सचिन महाजन, ज्ञानेश्वर देशमुख आणि सुशील सत्रे आदींच्या पथकाने केली.
