जळगावातील मनपा घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील फाईलची चोरी : अज्ञाताविरोधात गुन्हा
Theft of file related to Jalgaon Municipal Corporation’s Gharkul housing scheme scam : Case registered against unknown person जळगाव (4 जुलै 2026) : जळगाव महानगरपालिकेच्या अभिलेख विभागातून घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील फाईल चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने जळगावातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनपाचे नगररचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक अमोल वसंतराव पाटील (32) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री 9.30 वाजता शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
2006 मध्ये जळगाव मनपा घरकुल गैरव्यवहार प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. 13/2006) दाखल आहे. तपासादरम्यान 9 फेब्रुवारी 2006 रोजी झालेल्या पंचनाम्यानुसार 14 फाइल्स जप्त करण्यात आल्या रूम होत्या, त्यानंतर घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील गट क्र. 337/3 अ/1 व गट क्र. 337/3 अ/2 या गटांच्या नवीन तयार केलेल्या मूळ फाईली रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. न्यायालयीन कामकाजासाठी 31 जानेवारी 2024 पासून नगररचना विभागामार्फत रेकॉर्ड इंचार्जकडे या संचिकेची वारंवार मागणी केली जात होती मात्र ‘सदर फाइल रेकॉर्ड रूममध्ये मिळून येत नाही’, असे लेखी उत्तर रेकॉर्ड कीपरकडून देण्यात आले. त्याची दखल घेत तत्कालीन मनपा आयुक्तांनी 15 मे 2026 रोजी लेखी आदेश काढून याबाबत तक्रार देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री जळगाव शहर पोलिसात प्रभारी सहाय्यक संचालक अमोल वसंतराव पाटील (32) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

