ट्रकच्या चाकाखाली आल्याने रावेरात 75 वर्षीय वृद्धा ठार
75-year-old woman dies in Raver after being hit by truck रावेर (7 जुलै 2026) : 75 वर्षीय महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रावेर शहरातील बर्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ रविवारी सकाळी घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (क्रमांक एच.पी.19 जी.655) हा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी जात होता. त्याचवेळी चहा पिऊन परत येत असलेल्या पितांबरबाई शहा बाबुसा शहा (75) या ट्रकच्या मागील बाजूस आल्या. ट्रक सुरू असल्याचा अंदाज न आल्याने त्या मागील चाकाखाली सापडल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत पितांबरबाई शहा या मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील बडवारा येथील रहिवासी होत्या. रोजगाराच्या शोधात त्यांचे संपूर्ण कुटुंब काही दिवसांपूर्वी रावेरात आले होते. अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणार्या या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या दुःखामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी बाळा आमोदकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनीही रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीदरम्यान पादचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.