भुसावळातील विवाहितेचा पाच लाखांसाठी छळ : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
भुसावळ (8 जुलै 2026) : प्लॉट खरेदीसाठी माहेरुन पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी जळगावातील सासर व भुसावळातील माहेर असलेल्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भुसावळ व जळगाव परिसरात घडली.
असे आहे छळ प्रकरण
याबाबत सानीयाबी समीर खान (19, पिंप्राळा हुडको, जळगाव; ह.मु.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 2 फेब्रुवारी 2025 रोजी भुसावळ येथील मुस्लीम कॉलनी, बड़ी खानखा येथे मुस्लिम रितीरिवाजानुसार समीर खान रशीद खान यांच्यासोबत झाला होता. लग्नावेळी आई-वडिलांनी सोन्या-चांदीचे दागिने, एक लाख रुपये रोख रक्कम तसेच संसारोपयोगी साहित्य दिले होते.

लग्नानंतर सुरुवातीचे दोन महिने पती समीर खान व कुटुंबीयांनी चांगली वागणूक दिली मात्र त्यानंतर सासू अफसाना बी, सासरे रशीद खान, दिर मोहसीन खान, नणंद गजाला बी.रशीद खान तसेच शेजारी राहणारी साहीस्ता (पूर्ण नाव अज्ञात) यांनी जेवण बनवता येत नाही, अशा कारणांवरून टोमणे मारत मानसिक छळ सुरू केला. याबाबत पतीकडे तक्रार केल्यास त्यांनी घरातील लोक जे सांगतील तेच कर असे सांगून उलट शिबिगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मूलबाळ होत नाही, पैशांसाठी छळ
विवाहितेला मुलबाळ होत नाही, असा आरोप करून सासू अफसाना बी. व नणंद गजाला बी.रशीद खान यांनी वारंवार अपमान करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यानंतर 12 नोव्हेंबर 2025 रोजी दोन्ही बाजूंचे नातेवाईक एकत्र येऊन समझोता करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यावेळी सासरच्यांनी प्लॉट खरेदीसाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हातमजुरी करणार्या आई-वडिलांनी पैसे उभे करण्याची विनंती करून तात्पुरता समझोता करण्यात आला होता.
दरम्यान, 4 मार्च 2026 रोजी पती समीर खान, सासू अफसाना बी, सासरे रशीद खान, दिर मोहसीन खान व नणंद गजाला बी रशीद खान यांनी फिर्यादीस मारहाण करून पाच लाख रुपये घेऊन ये, असे सांगत घराबाहेर काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर फिर्यादी माहेरी राहू लागली. पतीला संपर्क साधून परत घेऊन जाण्याची विनंती करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी महिला समुपदेशन केंद्र, भुसावळ येथे लेखी तक्रार दिली. मात्र तेथेही पती व सासरचे लोक उपस्थित राहिले नाहीत.
सततच्या त्रासाला कंटाळून सानीयाबी समीर खान यांनी 7 जुलै 2026 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती समीर खान रशीद खान, सासू अफसाना बी, सासरे रशीद खान, दिर मोहसीन खान, नणंद गजाला बी.रशीद खान व शेजारी साहीस्ता (पूर्ण नाव अज्ञात) अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रशांत देशमुख करीत आहेत.