आमदार चंद्रकांत पाटील यांची शिष्टाई सफल : फुलगाव सरपंचांचे उपोषण सुटले


भुसावळ (मंगळवार, 14 जुलै 2026) : विविध मागण्यांसाठी फुलगाव येथील लोकनियुक्त सरपंच श्याम फुलगावकर यांनी उपोषण छेडले होते. हे उपोषण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने मंगळवारी सोडवण्यात आले. संबंधित अधिकार्‍यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली व सरपंचांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यानंतर उपोषण सुटले.

विविध मागण्यांसाठी उपोषण
सरपंच श्याम फुलगावकर यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करत तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने आणि काही ग्रामपंचायत सदस्यांकडून सातत्याने दबाव टाकला जात असल्याचा निषेध म्हणून उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले होते मात्र सरपंचांचे समाधान झाले नव्हते. यानंतर आमदार पाटील यांनी सरपंचांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्रामपंचायतीच्या कामात अडथळा आणणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच या प्रकरणात आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. सरपंच श्याम फुलगावकर यांना सोबत घेऊन जळगाव येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत. ग्रामपंचायतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्र्यांचीही भेट घेऊन निधीचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नेते विलास मुळे, तालुकाध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विनोद झोपे, निलेश ठाकूर , सुभाष चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !