किनगावात बालकाची विहिरीत ढकलून हत्या : मृताची आजी कोठडीत
Boy murdered by being pushed into well in Kingaon; victim’s grandmother in custody यावल (बुधवार, 15 जुलै 2026) : यावल तालुक्यातील किनगावात विवाहितेला आणि तिच्या मुलाला विहिरीत ढकलण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेत सुदैवाने विवाहिता बचावली मात्र तिचा साडेतीन वर्षीय बालक मयत झाला होता. या प्रकरणी मृताच्या आजीला पोलिसांनी अटक केली. बुधवारी यावल न्यायालयाने महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वृद्धेची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. मयत बालकाचे वडील तथा प्रकरणातील संशयीत आरोपी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने त्यांना पोलिसांनी तपासात सहकार्य करणार या अटीच्या नोटीसीवर मुक्त केले.
असे आहे हत्या प्रकरण
किनगाव येथे सोमवारी स्वप्निल भागवत पाटील यांच्या डांभुर्णी रस्त्यावरील शेताच्या विहिरीत सरस्वती पाटील (27) व कृष्णा पाटील (साडेतीन वर्ष) या दोघांना दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विवाहितेचे पती स्वप्नील पाटील व सासू आशाबाई भागवत पाटील यांनी विहिरीत ढकलून दिले होते. या घटनेत बालकाचा मृत्यू झाला होता तर विवाहिता गंभीर जखमी झाली. या प्रकरणी दोघांविरुद्ध बालकाचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी महिलेची कोठडीत रवानगी
गुन्ह्यातील आशाबाई पाटील यांना अटक करून यावल पोलिसांनी बुधवारी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश आर.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले स्वप्निल भागवत पाटील यांना पोलिसांनी वेळोवेळी पोलीस तपासात सहकार्य करण्याच्या अटीच्या नोटीसीवर मुक्त केले. तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.
