जळगावात गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : सोलापूरचा संशयीत एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व दुचाकीसह 2.12 लाखांचा मुद्देमाल जप्त
Terror in Jalgaon caused by the threat of a country-made pistol : Solapur suspect nabbed by MIDC police जळगाव (शुक्रवार, 17 जुलै 2026) : जळगाव शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना गावठी कट्टा बाळगणार्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. संशयिताकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण 2 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिषेक संजय हवालदार (23, रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा.बुधवार पेठ, सोलापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, 15 जुलै 2026 रोजी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, विनापरवाना गावठी कट्टा बाळगणारा एक इसम महामार्ग परिसरात फिरत आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयीत अभिषेक संजय हवालदार (23, रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा.बुधवार पेठ, सोलापूर) यास ताब्यात घेतले. झडतीदरम्यान गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी करीत आहेत.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, विशाल कोळी, सुभाष साबळे, योगेश घुगे आदींच्या पथकाने केली.