शनीपेठ पोलिसांची मोठी कारवाई : भरदिवसा एक लाखांची रोकड लांबवणार्‍या आरोपीला बेड्या

दुचाकीच्या डिक्कीतून लांबवली रोकड : रकमेस गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त


Major action by Shanipeth police : Accused arrested for stealing ₹1 lakh in cash in broad daylight जळगाव (शनिवार, 18 जुलै 2026) : जळगावातील कालिका माता मंदिर परिसरातील एचडीएफसी बँकेबाहेर व्यावसायीक पाणीपुरी खात असताना भामट्याने संधी साधून दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख रुपये लांबवले होते. शनिपेठ पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत स्थानिक आरोपीला अटक केली आहे. चोरीची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कूटरही जप्त करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली. रवी जगदीश प्रजापत (36, रा.प्रजापत नगर, ममुराबाद रोड, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण
जळगावातील ऑटो पार्ट विक्रेता अबरारअली इरफान अली चौधरी (26, लक्ष्मीनगर, मेहरूण, जळगाव) यांनी 13 जुलै 2026 रोजी दुपारी 3.30 ते 4.10 वाजण्याच्या दरम्यान कालिका माता मंदिराजवळील एचडीएफसी बँकेबाहेर पाणीपुरी खाण्यासाठी थांबले असताना त्यांची दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.4984) च्या डिक्कीतून चोरट्यांनी एक लाखांची रोकड अलगद लांबवली. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.


तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी जाळ्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना आरोपीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर विशाल जयस्वाल यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळ व परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज संकलित करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्याचबरोबर गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून माहिती गोळा करून संशयिताचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रवी जगदीश प्रजापत (36, रा. प्रजापत नगर, मामुराबाद रोड, जळगाव) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला निसर्ग कॉलनी, असोदा रोड, जळगाव येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेले एक लाख रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, हवालदार योगेश जाधव, हवालदार विजय खैरे, हवालदार निलेश दुगो, पराग दुसाने, अमोल वंजारी, गणेश ढाकणे, योगेश साबळे आदींनी केली. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण हवालदार मुबारक देशमुख यांनी करीत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

तर 112 वर करा तक्रार
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू वाहनात अथवा वाहनाच्या डिक्कीत ठेवून जाऊ नये तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !