यावलला गावराणी तूप व्यावसायीकाकडे छापा : टीप दिल्याच्या संशयावरून महिलेस जातीवाचक शिविगाळ
यावल (रविवार, 19 जुलै 2026) : यावल शहरातील न्यू व्यास नगर भागात एक व्यक्ती खाजगी स्वरूपात गावराणी तुपाचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे गुरुवारी अचानक अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी छापा टाकला आणि त्याच्याकडून काही सॅम्पल घेऊन प्रयोग शाळेत पाठवले. दरम्यान या भागातील रहिवाशी अनुसूचित जातीच्या महिलेने व त्याच्या कुटुंबाने तक्रार केल्यामुळे छापा पडल्याचा संशय घेत एका इसमाने त्यांना जातीवाचक शिविगाळ केली आणि धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सदर इसमाविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागात न्यू व्यास नगरातील रहिवासी चंदू कल्याण काठेवाडी हा खाजगी स्वरूपात गावरानी तुपाचा व्यवसाय करतो. घरीच तो गावराणी तुप तयार करतो. त्याच्याकडे जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी गुरुवारी छापा टाकला होता व त्याच्या घरून तुपाचे काही सॅम्पल घेवून ते प्रयोगशाळेत पाठवले. याच भागातील रहिवाशी अनुसूचित जातीच्या महिला आणि त्याच्या कुटुंबानेच आपल्याकडे अन्न व औषध प्रशासनाला छापा टाकण्यासाठीची टीप दिली, असा संशय बाळगत चंदू काठेवाडी यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तुला व तुझ्या मुलांना बघून घेईल, तुला येथे राहणे मुश्किल करेल, असे धमकी दिली.


याप्रकरणी महिलेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अॅट्रॉसिटीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.