भुसावळ शहरातील बेपत्ता महिलेचा तापी नदीत मृतदेह आढळला
यावल (रविवार, 19 जुलै 2026) : भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील 70 वर्षीय वृद्ध महिला भुसावळ शहरातून बेपत्ता झाली होती. रविवार, 12 जुलैपासुन बेपत्ता झालेल्या या महिलेच्या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान, या वृद्धेचा मृतदेह अंजाळेजवळील तापी नदीच्या पात्रात आढळला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
खंडाळा, ता.भुसावळ येथील रहिवासी बेबाबाई फुलसिंग पाटील (70) ही वृद्ध महिला रविवार, 12 जुलै रोजी भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजजवळ आली व तेथून ती बेपत्ता झाली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रारंभी हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली व महिलेचा शोध सुरू होता. दरम्यान वृद्धेचा मृतदेह गुरुवारी यावल तालुक्यातील बोरावल जवळील तापी नदीच्या पात्रात मिळून आला.


त्यांचा मृतदेह तेथून ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन केले व मृतदेह कुटूबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.