10 हजारांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
आत्महत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी 30 हजारांची मागणी ; पहिला हप्ता स्वीकारताना नाशिक एसीबीने आवळल्या मुसक्या
गणेश वाघ
नाशिक (रविवार, 19 जुलै 2026) : नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या बिटको चौकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिरामण शेजवळ (55) व पोलीस अंमलदार गणेश मुकुंद कुमावत (38) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या मेहुण्याने बुधवार, 15 जुलै 2026 रोजी घराशेजारील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.


या तपासादरम्यान आरोपी अधिकार्यांनी तक्रारदाराला बिटको चौकीत बोलावून, तुमच्या जाचाला कंटाळून तुमच्या मेहुण्याने आत्महत्या केली आहे. तुमच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करू ; तो टाळायचा असेल तर 30 हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केली. एसीबीने शनिवार, 18 जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपींनी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात आरोपींनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस हवालदार योगेश साळवे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे आदींनी केली.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले असून, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.