नाशिक हादरले : प्रेयसीची हत्या करीत प्रियकरानेही घेतला गळफास

उद्यानात बसलेल्या प्रेयसीवर केला चाकूहल्ला : नियोजित वराला लाईव्ह कॉल करून ऐकवल्याची माहिती


नाशिक (रविवार, 19 जुलै 2026) : ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या प्रेयसीचे लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या गळ्यावर चाकूने वार करीत तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये घडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रेयसीची हत्या करीत प्रियकरानेही जॉगिंग ट्रॅकवर झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे शनिवारी पहाटे उघडकीस आले.

वैष्णवी अनिल आवारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून ती अमळनेरची रहिवासी आहे तर साहिल लाव्हारे (रा. उमरखेड, यवतमाळ) असे आत्महत्या करणार्‍या प्रियकराचे नाव आहे.


काय आहे प्रकरण ?
सूत्रांच्या माहितीनुसार, मूळची अमळनेरची रहिवासी असलेली वैष्णवी आवारे ही पूर्वी साहिल लाव्हारेसोबत यवतमाळमध्ये लिव्हईनमध्ये राहत होती मात्र काही दिवसांपूर्वीच ती नाशिकमध्ये स्थलांतरीत झाली व वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री 10.30 वाजता ती मैत्रिणीसोबत बसली असतानाच संशयीत आला व त्याने तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने प्रतिसाद न दिल्याने तरुणाने सोबतच्या चाकूने तिच्यावर वार केला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या युवकासोबत तिचे लग्न ठरले होते, त्याला फोन करून संशयित साहिल अशोक लव्हारे याने लाईव्ह मर्डर कॉल ऐकवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लाईव्ह मर्डर ऐकवला
गोपाल बैरागी (28, रा. दत्त चौक, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, बहिण ज्योती बैरागी हिची मैत्रिण दीपाली सोनवणे हिच्या सोबत मागील पंधरा दिवसांपासून वैष्णवी आवारे राहात होती. दीपाली आणि वैष्णवी या दोघी ज्योतीच्या घरी आल्या. दोघी बहिणीकडे सहा दिवस मुक्कामी राहिल्याने चांगली ओळख झाली. दीपालीने वैष्णवी ही चांगली मुलगी आहे. तिला आई-वडील नाहीत, आजी-आजोबा आहेत.

वैष्णवीसोबत लग्नाची बोलणी सुरू होती. तिच्या आजी-आजोबांना याबाबत कल्पना दिली होती. लग्न ठरवताना वैष्णवीने तिचे आणि साहिल लाव्हारे (रा.उमरखेड, यवतमाळ) याच्यासोबत प्रेमसंबंध होते, आम्ही लिव्ह इनमध्ये उमरखेड येथे राहत असल्याचे सर्व खरी हकीकत सांगितली होती. तिच्या या प्रामाणिकपणामुळे तिच्यावर विश्वास वाढला. लग्न करण्याचे ठरवले. मात्र ही बाब साहिल यास समजली. तो फोन करून त्रास देत असल्याचे वैष्णवीने सांगितले होते. तो बुधवार, 15 जुलैला नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळाली. शनिवारी त्याने वैष्णवीला मारल्याचा लाईव्ह फोन ऐकवला.

दरम्यान, खुनाची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. लेकीच्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने ऑनलाईन दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !