आमदार खडसे-मंत्री महाजनांमधील दरी मिटणार ! अभीष्टचिंतन सोहळ्याच्या निमंत्रणानंतर मनोमिलनाच्या चर्चांना जोर
गणेश वाघ
भुसावळ (रविवार, 19 जुलै 2026) : विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस असल्याने अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांसह सत्ताधारी भाजपातील केंद्रासह राज्यातील नेते मुक्ताईनगरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपाचे नेते व मंत्री, संकट मोचक गिरीश महाजनांना आमदार खडसे निकटवर्तीयांनी कार्यक्रमासांठी निमंत्रण दिल्यानंतर आता दोन्ही नेत्यांमधील दरी मिटण्याची आशा वर्तवली जात आहे. मंत्री महाजनांनी आस्थेवाईकपणे कार्यक्रमाची रूपरेषा विचारली व कार्यक्रमास हजेरी लावण्याबाबत आश्वस्त केले. दोन्ही हेवीवेट नेत्यांमधील वैर नवीन नाही मात्र नेत्यांमधील वैर मिटल्यास जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
मंत्र्यांना निमंत्रण अन् मनोमिलनाची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसामित्त 2 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी सोहळा साजरा होत आहे. या निमित्त स्वीय सहाय्यक योगेश कोलते व भुसावळचे माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी जामनेरात मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली व त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगत महाजन यांनीही सोहळ्याला यावे, अशी विनंती करण्यात आली.


यावेळी स्वागत समितीत महाजन यांचे नाव समाविष्ट करण्याबाबत चर्चा झाली मात्र महाजन यांनी त्यावर मिश्कील प्रतिक्रिया देत समितीत आपले नाव नको, असे स्पष्ट केले. तरीही त्यांनी निमंत्रण पत्रिका बारकाईने पाहिली आणि कार्यक्रमाबाबत सकारात्मक संकेत दिले.
राजकीय वितुष्टाला पूर्णविराम मिळणार?
जळगावच्या राजकारणात खडसे आणि महाजन यांच्यातील संघर्ष अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय शाब्दिक युद्धामुळे दोन्ही नेत्यांमधील दुरावा कायम राहिला मात्र खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या सहाय्यकांनी महाजनांची घेतलेली भेट आणि कार्यक्रमाचे दिलेले निमंत्रण यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आता गिरीश महाजन या सोहळ्याला उपस्थित राहतात का आणि दोन्ही नेत्यांमधील राजकीय वितुष्टाला खरोखरच पूर्णविराम मिळतो का, याकडे जळगावसह राज्याचे लक्ष लागले आहे.