सुकी नदीच्या डोहात यावलचा अल्पवयीन तरुण बुडाला

पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला : शहरात हळहळ


यावल (रविवार, 19 जुलै 2026) : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांतील हरिपूरा धरणाच्या वरील बाजुस असलेल्या सुकी नदीच्या डोहात रविवार, 19 रोजी दुपारी यावल शहरातील 17 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जयेश संजय फेगडे (रा.महाजन गल्ली, यावल) असे मृताचे नाव आहे. तो कुंटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली आहे.

पर्यटनासाठी गेल्यानंतर दुर्घटना
जयेश फेगडे हा रविवारी सुट्टी असल्याने आपल्या चुलत भाऊ व वहिनीसोबत हरिपूरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. पावसामुळे नटलेल्या निसर्गाचा आनंद घेत असताना तो धरणाच्या वरील बाजुस असलेल्या सुकी नदीच्या डोहातील पाण्यात पोहण्याकरीता गेला. त्यात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला.


नातेवाईकांचा आक्रोश
जयेश हा यावल येथील होमगार्ड संजय सीताराम फेगडे यांचा मुलगा होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !