राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर पलटी : विषारी रसायनाची गळती : अग्निशमन दल घटनास्थळी
जळगाव (सोमवार, 20 जुलै 2026) : राष्ट्रीय महामार्गावर गुजरात राज्यातून नागपूरच्या दिशेने जात असलेला कंटेनर (जी.जे.06 बी.टी.8845) हा कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. अपघातानंतर कंटेनरमधील ऑर्थो-नायट्रोटोल्युईन या ज्वलनशील व विषारी रसायनाची गळती झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने, क्रेन आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल करण्यात आल्या. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.


सुदैवाने संबंधित कंटेनर हा महामार्गाच्या खाली पलटी झाल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाली नाही तर वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, ऑर्थो-नायट्रोटोल्युईन हे रसायन रंगद्रव्ये (डाई), रबर रसायने, कृषी रसायने तसेच औषधनिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरले जाते. हे विषारी स्वरूपाचे रसायन असल्याने नागरिकांनी घटनास्थळाजवळ गर्दी करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून गळती नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने कळवले आहे.