जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : चार लाखांच्या गुटख्यासह शेगावातील संशयीत जाळ्यात
मुक्ताईनगरजवळ सापळा रचून कारवाई ; गुटख्याची वाहतूक ऐरणीवर
जळगाव (सोमवार, 20 जुलै 2026) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवैध गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तीन लाख 86 हजार 908 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच कार आणि दोन मोबाईल मिळून 12 लाख सहा हजार 908 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शेगावातील दोन संशयीतांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून होते. शुक्रवार, 17 जुलै 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे मारुती सुझुकी अर्टिगा (एम.एच.30 ए.झेड.4664) या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मुक्ताईनगरकडे जाणार्या मार्गावर सापळा रचून संबंधित वाहन अडविले. तपासणीदरम्यान वाहनातून विविध कंपन्यांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. कारवाईदरम्यान तीन लाख 86 हजार 108 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, आठ लाख रुपयांची मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि 20 हजार रुपये किंमतीचे व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल फोन, असा एकूण 12 लाख सहा हजार 108 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दोन आरोपींना अटक
या प्रकरणात सय्यद आरिफ सय्यद हकीम (नदीम) (35, रा.पिंपळगाव राजा, ता.खामगाव, जि.बुलढाणा) व खलील उल्ला खान (32, रा. शेगाव रोड, खामगाव, जि.बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आाल.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील (मुक्ताईनगर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस नाईक हेमंत पाटील आणि पोलीस शिपाई रत्न गीते यांच्या पथकाने केली.