कवींनी कवितेत मांडलेले माय बाप डोळ्यासमोर ठेवा


कवी मनोहर आंधळे : यावल महाविद्यालयात अंतर्नाद पुष्पांजली व्याख्यानमाला

यावल : शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात भेटलेली कविता डोळस बनवते.तिच्यातला एखादा शब्द आयुष्याला कधी चमत्कारीक वळण देईल हे सांगता येत नाही. कवींनी कवितेत मांडलेले माय बाप डोळ्यासमोर ठेवा, असा सल्ला चाळीसगावचे कवी मनोहर आंधळे यांनी येथे दिला. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुष्पांजली प्रबोधानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यात यावलच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘कविता बोलते युवकांच्या काळजाशी’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
प्राचार्य डॉ.एफ.एम.महाजन अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी, शिक्षण व संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष आमदार हरीभाऊ जावळे, यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, तहसीलदार जितेंद्र कुंवर, पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपप्राचार्य संजय पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. भुसावळ रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अरुण मांडळकर, चंद्रकांत अंबाडे, गणेश भालेराव धीरज महाजन, प्रभाकर नेहते, दिनेश महाजन यांचीही उपस्थिती लाभली. व्यंकटेश बारी, रीतेश बारी, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, भूषण झोपे, ईश्वर पवार, सचिन पाटील, आकाश कोळी, भूषण फेगडे, संजय कदम यांचे सहकार्य लाभले. सूत्र संचालन उपप्राचार्य एम.डी.खैरनार यांनी तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख संजय भटकर यांनी केले. उपक्रमाची रूपरेषा अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी मांडली. संयोजक प्रा.डॉ.जतीन मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर घुले हे होते.

माय कवितेने रसिकांचे डोळे पाणावले
कवी मनोहर आंधळेंनी सुरवातीला ‘बलसागर भारत होवो ‘ हे गीत सादर केले. त्यातून राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढले. वसंत बापट यांच्या ‘हा देश माझा याचे जरासे भान राहू द्या’ हे गीत सादर करून जाज्वल्य देशभक्ती चेतवली.त्यानंतर स्व-लिखीत ‘घड्यायाची काट्यावानी चाले झपाझप माय ,कधी कये ना म्हने कुठे गेला याय.’ हे कविता सादर केली. या कवितेतून त्यांनी मातेची ममता, कष्ट, प्रेम मांडले.

बेटी बचाव बेटी पढावचा संदेश
ज्येष्ठ बंधू वा.ना.आंधळे यांची ‘तू जसे पहिले जग, मलादेखील पाहू दे, आई मला जन्म घेऊ दे’ हे कविताही मनोहर आंधळे यांनी सादर केली. त्यातून त्यांनी कन्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश दिला. त्यानंतर स्वरचित ‘काया धरतीच्या लेका कर इचार जरासा, कर्जापायी करू नको तुह्या जीव वेडापिसा ‘ ही कविता सादर केली. त्यातून त्यांनी शेतकर्‍यांनी आत्महत्येचे टोकांच पाऊल उचलू नये, अशी अटही घातली.

वाड़मयीन गोडी लागणार
व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाड़मय वाचनाची गोडी लागेल. आपल्या भागातील सारस्वतांची ओळख होईल, असा विश्वास नामदार हरीभाऊ जावळे यांनी व्यक्त केला. साहित्य श्रवणातून विध्यार्थ्याना वाचन,लेखन,चिंतनाची प्रेरणा मिळेल. कविता अंतर्मनाला भावते, असे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील म्हणाले.


कॉपी करू नका.